>> सूर्यकुमार यादवची समयोचित फलंदाजी
>> चेन्नई सुपरकिंग्सचा ६ गड्यांनी पराभव
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सचा ‘क्वॉलिफायर १’मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर ६ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने फलंदाजीस अवघड असलेल्या खेळपट्टीवर १३१ धावांपर्यंत मजल मारली. धावांचा पाठलाग करताना मुंबईला सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७१ धावांची खूप मजत झाली. त्याच्या या समयोचित खेळीमुळे मुंबईला स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली. पराभवानंतरही चेन्नईचे आव्हान कायम असून दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार्या ‘एलिमिनेटर’ सामन्यातील विजेत्या संघाशी शुक्रवारी चेन्नईला झुंजावे लागणार आहे.
किचकट लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चेन्नईप्रमाणेच खराब झाली. त्यांचा कर्णधार रोहित शर्मा तर केवळ दोनच चेंडू टिकला. पहिल्या चेंडू चौकाराचा सामना करावा लागल्यानंतर दीपक चहरने दुसर्याच चेंडूवर रोहितला पायचीत केले. दुसरा सलामीवीर क्विंटन डी कॉकदेखील फार वेळ टिकला नाही. ‘वाईड लॉंग ऑफ’वर ड्युप्लेसीकडे सोपा झेल देत त्याने तंबूची वाट धरली. या दोन धक्क्यांतून मुंबईला सावरण्याचे काम सूर्यकुमार यादव व ईशान किशन (२८) यांच्या भागदारीने केले. या दोघांनी धावफलक सतत हलता ठेवत तिसर्या गड्यासाठी ८० धावा जोडल्या. या द्वयीमुळेच मुंबईला शतकी वेस ओलांडता आली. डावातील चौदाव्या षटकात ताहीरने किशन व कृणाल यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत खळबळ माजवली. परंतु, स्थिरावलेला सूर्यकुमार व अनुभवी हार्दिकने अधिक पडझड होणार नाही याची दक्षता घेत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ ड्युप्लेसी व शेन वॉटसन यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली. मलिंगाने टाकलेल्या पहिल्या षटकात केवळ एक धाव आली. खेळपट्टीचे संथ स्वरुप ओळखून कृणाल पंड्याने दुसर्या टोकाने सुरुवात केली. त्याच्या या षटकात चेन्नईला केवळ पाच धावा जमवता आल्या. ड्युप्लेसीचा संघर्ष फार वेळ टिकला नाही. राहुल चहरने टाकलेल्या डावातील तिसर्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बदली खेळाडू अनमोलप्रीतकडे झेल देऊन बाद झाला. बॅकफूटवरून पॉईंटच्या वरून मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला व थेट ‘पॉईंट’च्या हातात जाऊन चेंडू विसावला. डावखुरा सुरेश रैना मैदानात उतरताच रोहितने चौथे षटक टाकण्यासाठी ऑफस्पिनर जयंतला गोलंदाजीस पाचारण केले. त्याने उंची दिलेला चेंडू मैदानाबाहेर भिरकावण्याच्या नादात रैना सोपा झेल देत परतला. रैनाला केवळ पाच धावा जमवता आल्या. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर शेन वॉटसनने संयमी सुरुवात केली, पण नंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो देखील मोठा फटका खेळून बाद झाला. जयंत यादवने उलट दिशेने धावत जाऊन त्याचा अप्रतिम झेल टिपला. केदार जाधव दुखापतग्रस्त असल्याने संधी मिळालेला मुरली विजय मधल्या फळीत फलंदाजीस उतरला. चांगली सुरुवात केल्यानंतर राहुलच्या भिंगरीप्रमाणे वळलेल्या चेंडूवर तो यष्टिचीत झाला. मुरली विजयला काही कळण्याआधीच यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने त्याला माघारी धाडले. मुरली विजयने २६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. अखेर अंबाती रायडू आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि चेन्नईला १३१ धावांपर्यंत मजल मारून दिली. रायडूने नाबाद ४२ तर धोनीने नाबाद ३७ धावा केल्या.
या सामन्यासाठी दोनही संघांमध्ये प्रत्येकी एक बदल करण्यात आला. मुंबईने डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल मॅकलेनाघन याला वगळून त्याच्या जागी फिरकीपटू जयंत यादवला संधी दिली आहे. तर चेन्नईच्या केदार जाधवला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागल्याने त्याच्या जागी मुरली विजयला संघात स्थान मिळाले.
धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स ः फाफ ड्युप्लेसी झे. अनमोलप्रीत सिंग गो. राहुल ६, शेन वॉटसन झे. जयंत यादव गो. कृणाल १०, सुरेश रैना झे. व गो. जयंत यादव ५, मुरली विजय यष्टिचीत डी कॉक गो. राहुल २६, अंबाती रायडू नाबाद ४२, महेंद्रसिंग धोनी नाबाद ३७, अवांतर ५, एकूण २० षटकांत ४ बाद १३१
गोलंदाजी ः लसिथ मलिंगा ३-०-२६-०, कृणाल पंड्या ४-०-२१-१, राहुल चहर ४-०-१४-२, जयंत यादव ३-०-२५-१, जसप्रीत बुमराह ४-०-३१-०, हार्दिक पंड्या २-०-१३-०
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा पायचीत गो. दीपक ४, क्विंटन डी कॉक झे. ड्युप्लेसी गो. हरभजन ८, सूर्यकुमार यादव नाबाद ७१ (५४ चेंडू, १० चौकार), ईशान किशन त्रि. गो. ताहीर २८, कृणाल पंड्या झे. व गो. ताहीर ०, हार्दिक पंड्या नाबाद १३, अवांतर ८, एकूण १८.३ षटकांत ४ बाद १३२
गोलंदाजी ः दीपक चहर ३.३-०-३०-१, हरभजन सिंग ४-०-२५-१, रवींद्र जडेजा ४-०-१८-०, ड्वेन ब्राव्हो ३-०-२५-०, इम्रान ताहीर ४-०-३३-२