
>> पंतप्रधानांचा राहुलवर घणाघात
उत्तर प्रदेशमधील एका निवडणूक प्रचार सभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली. राहुल गांधी यांचा नामोल्लेख न करता मोदी म्हणाले की तुमच्या वडिलांना अन्य देशांनी जरी क्लिन चीट दिली असली तरी त्यांचे आयुष्य भ्रष्टाचारी क्रमांक एक म्हणून संपले.
‘मिस्टर क्लीन’ म्हणून कॉंग्रेसजन तुमच्या वडिलांना संबोधत राहीले. मात्र त्यांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वन असा झाला असे मोदी म्हणाले. राफेलप्रकरणी कॉंग्रेस आणि खास करून राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी सातत्याने लक्ष्य केले जात असल्याने कॉंग्रेस जाणीवपूर्वक आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही यावेळी पंतप्रधानांनी केला. कॉंग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, जो पक्ष पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीच स्वत:ला पंतप्रधानपदाचा दावेदार समजत होता तो पक्ष आता उत्तर प्रदेशात आपण केवळ मते खाण्यासाठी निवडणूक लढवत असल्याची भाषा करून लागला आहे.
कर्म तुमची वाट पहात आहे : राहुल
‘मोदीजी, आता लढाई संपलेली आहे. आपले कर्म आपली वाट पाहत आहे’ अशा शब्दात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या दिवंगत वडिलांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केलेल्या टिकेला व्टिटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. तसेच त्यांची बहीण प्रियांका गांधी वड्रा यांनीही मोदींवर हल्लाबोल केला आहे. कोणतेही नियंत्रण नसलेल्या बेलगाम व्यक्तीने स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीच्या हौतात्म्याचा अपमान केला आहे अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी वड्रा यांनी व्यक्त केली आहे.