- दिलीप वसंत बेतकेकर
एखादी सवय बनण्यासाठी एकवीस दिवस ती कृती करावी लागते. या सुट्टीत केलेल्या उपक्रमांची, कार्यक्रमांची परिणती सवयीत होऊ शकते. या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टींचा पाया घातला जाऊ शकतो. कदाचित यातील एखादी कला, कौशल्य, छंद, सवय मुलाच्या आयुष्याला एक निराळंच वळण देऊं शकेल.
आणखी एक शैक्षणिक वर्ष संपलं. परीक्षा झाल्या. ताण कमी झाला. मुलांपेक्षा पालकांवरचा. सुट्टी सुरू झाली. आता शाळा सुरू होतील थेट जूनच्या पहिल्या आठवड्यात.
कशी घालवायची सुट्टी? काय बरं करायचं या सुट्टीत?
पूर्वी हा प्रश्न फारसा उद्भवत नसे. कारण सुट्टी सुरु झाली की मुलं पळायची मामा, मावशी, आत्या, काका इतर नातेवाईकांकडे. आता हे खूप कमी झालंय. हळूहळू काहींच्या बाबतीत तर ही नातीच संपत आली आहेत. आजच्या अनेक मुलांना काका, मामा, मावशी, आत्याच नाहीत. त्यामुळं स्वाभाविकपणे चुलत भावंडं, मावस भावंडं, मामेभावंडं, आतेभावडंच नाहीत. ही तर सोडाच, सख्खी भावंडंही नाहीत अशी पिढी समोर येतेय. त्यामुळे कोणाकडे येणं- जाणं नाही आणि कोणाचं आपल्याकडेही येणं- जाणं नाही. ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांचंही जाणं- येणं कमी होतंय.
आई वडील तर नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडणारच. मग मुलांनी घरात… सुट्टीत करायचं तरी काय? कसा घालवायचा वेळ?
पालकांसमोरचा हा मोठ्ठा प्रश्न.
यासंबंधी विविध मतप्रवाह आहेत.
मुलांना त्यांच्यापरीने हवी तशी घालवू द्या ना सट्टी. वर्षभर शाळा, शिकवण्यांना जुंपलेलीच असतात बिचारी. आता तरी मोकळेपणाने वावरू द्या त्यांना. हा झाला एक विचार.
मुलांना काहीच ठरवून दिलं नाही तर काही मुलं स्वत: जबाबदारीने वेळेचा चांगला उपयोग करतीलही.
पण दुसराही एक मतप्रवाह आहे. काही कार्यक्रम, उपक्रम योजून आखून दिला नाही तर नुसते दूरदर्शन, मोबाईल, व्हीडीओ गेम्स यातच दिवसभर अडकतील.
आणि हे बर्याच अंशी खरंही आहे.
जी मुलं स्वत:चं स्वत: ठरवून काही ना काही विधायक उपक्रमात गुंतवून घेत असतील त्यांच्या बाबतीत प्रश्नच नाही. पण अनेकांना काहीतरी सूचवावं लागतं, दाखवावं लागतं, सांगावं लागतं. प्रसंगी घेऊनही जावं लागतं, करून घ्यावं लागतं.
वर्षभर शाळेचं एक ठराविक वेळापत्रक असल्यामुळं ते पाळावंच लागतं. वेळेचं बंधन, जाण्यायेण्यातल्या अडचणी असल्यामुळे करायच्या अनेक गोष्टी राहून जातात. मुलांनी केल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत, अनुभवायला हव्यात अशा कितीतरी गोष्टी राहून जातात.
सुट्टीत यातलं काहीतरी… थोडं तरी करून बघता येईल, करून घेता येईल.
एका माध्यमिक विद्यालयाच्या पालक सभेत सहज चौकशी केली. किती जणांच्या मुलांना पोहता येतं. तेव्हा सुमारे शंभर पालकांपैकी आठ दहा पालकांचेच हात वर आले. फार आश्चर्य नाही वाटलं.
मुलांनी केल्या पाहिजेत अशा कितीतरी गोष्टी आहेत. पण शाळेच्या वेळापत्रकात आणि प्राधान्यक्रमात त्यांना स्थान नाही. पुस्तकाच्या आत खोलवर घुसणं आणि पुस्तकाच्या बाहेर भरपूर उंच भरारी घेणं हे अपेक्षित असलं तरी होत नाही. कारणं खूप आहेत. पण मुख्य कारण इच्छाशक्तीचा अभाव.
सुट्टीत काहीतरी करून पाहण्यासारखं नाही का? आणि ही सुट्टी काही थोडी थोडकी नाही. ठरवलं तर सुट्टीत बिनभिंतीची शाळा होऊ शकते. अनुभवाचं भांडार जेवढं अधिक खुलं होईल तेवढं व्यक्तिमत्व अधिक समृध्द होईल. बुध्दिमत्तेचे अनेक पैलू आहेत. प्रा. गार्डनर आठ प्रकारच्या बुध्दिमत्तांविषयी लिहितात, बोलतात.
प्रत्येक बालकाकडे किमान सात- आठ प्रकारच्या बुध्दिमत्ता असतातच, असं त्यांचं मत आहे. सर्वच्या सर्व बुध्दिमत्ता समान नसतात. उदा. एखादा बालकाकडे भाषिक बुध्दिमता अधिक असेल तर गणिती बुध्दिमत्ता थोडीशी कमी असेल. दुसर्याकडे गणिती बुध्दिमत्ता अधिक असेल व भाषिक बुध्दिमत्ता थोडीशी कमी असेल. कमी जास्त प्रमाणात सर्व बुध्दिमत्ता प्रत्येकाकडे असतातच.
प्रश्न आहे बुध्दिमत्ता ओळखण्याचा आणि पुढे त्या बुध्दिमत्तांचा अधिक विकास करण्याचा. शाळेच्या ठरलेल्या रेट्यात जर वेळ मिळत नसेल, इच्छाशक्ती नसेल किंवा त्याचं महत्वच जाणवत नसेल तर निदान काही सुजाण पालक … सगळे करतील अशी वेडी आशा नाही… तरी त्या दिशेने प्रयत्न करतील व सुट्टीचा उपयोग करून घेतील. त्यांच्यासाठीच हा लेख आहे.
सुमारे पस्तीस दिवस पालक व मुलांच्या हातात आहेत. दिवसाला किमान एक उपक्रम असं म्हटलं तरी खूप उपक्रम होतील. काही घरात करण्याचे तर काही घराबाहेर करण्याचे. काही एकट्यानेच करता येतील, काही कुटुंबाला करता येतील तर काही समवयस्क मुलांबरोबर मित्रांबरोबर करतां येतील. येत्या सुट्टीत चार- पाच शनिवार, रविवार मिळतात. त्यांचा उपयोग छान करता येईल.
अगदी पोहण्याचंच उदाहरण घेतलं तर महिनाभरात उत्कृष्ट पोहायला शिकता येण्यासारखं आहे. कितीतरी कला कौशल्यं शिकण्यासाठी वेळ आणि संधी आहे. संगीत, नाट्य, चित्रकला, हस्तकला, क्रीडा शिबिरं असं खूप काही करतां येण्यासारखं आहे. नुसतं रानावनात भटकून येणं हा केवढा आनंददायी अनुभव असतो!
प्रत्येक घरात एक तरी स्मार्टफोन असतो. नेटवरनं सुट्टीत करतां येण्यासारख्या शेकडो उपक्रमांची (की उपद्व्याप) सूची मिळते. वर्तमानपत्रांतून विविध शिबिरांची माहिती मिळते.
वानगीदाखल काही उपक्रमांची सूची करूया.
* भेटी देण्याची स्थळे : ग्रंथालय, बँक, पोस्ट ऑफिस, मिठागर, म्युझियम, विज्ञान केंद्र, छापखाना, कारागिरांच्या कार्यशाळा (वर्कशॉप्स), गोशाळा, रोपवाटीका, ऐतिहासिक महत्वाची स्थाने.
* कला कौशल्य विकास : गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्रकला, हस्तकला, वक्तृत्व, मूर्तीकला, लेखनकला, हस्ताक्षर, विज्ञानप्रयोग, फोटोग्राफी.
आरोग्यविषयक : योग, प्राणायाम, व्यायाम, आसनं.
वाचन : वाचनालयाचे सभासदत्व, वर्तमान पत्रांतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, विनोद यांचा संग्रह बनवणे, कात्रण वह्या बनवणे,
खेळ ः क्रिकेट सोडून इतर भरपूर खेळ आहेत. कमी वेळात, छानपैकी मनोरंजन, विना खर्च असे खेळ रोज संध्याकाळी मैदानावर घेतां येतील. विशेषत: लगोरी, विटीदांडू, कबड्डी, खोखो, गोट्या (गड्डे) असे खेळ आजच्या मुलांना नवीनच ठरतील.
ही लांबलचक सूची वाचल्यावर पालकांच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल. ‘अरे, पण हे आम्ही कधी आणि कसं करायचं? आम्हाला कामधंदा आहे ना?’
बरोबर. पालकांना त्यांचे उद्योग, नोकरी व्यवसाय आहेत. पण त्यातूनही मार्ग काढता येतो. अर्थांत इच्छाशक्ती असेल तरच.
आठ दहा कुटुंबांचा एक गट बनवायचा. आणि या गटाने या दहा कुटुंबांतील मुलांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रमांची योजना आखायची. सोप्या शब्दांत सांगायचं तर या पालकांची एक ‘सिंडीकेट’ बनवायची. पालकांनी जबाबदार्या, कामं, वेळ वाटून घ्यायचा. आणि आलटून पालटून सहभाग द्यायचा. त्यामुळे स्वाभाविकपणे काम, वेळ, पैसा, शक्ती यांचे विभाजन होऊन एकावरच ओझं होणार नाही.
एक उदाहरण घेऊया. सात- आठ मुलांना तलावावर पोहायला नेणं. नदी, समुद्रावर न नेता ज्या ठिकाणी प्रशिक्षक आहे अशा ठिकाणी (म्हापसा, पणजी, मडगाव) नेणं. अगदी वीस- पंचवीस किलोमिटर दूरवरून सुध्दां आलटून पालटून पालक कंपनी देऊं शकतात. गाड्या तर घरोघरी आहेत. रोज एकट्यावरच जबाबदारी न देतां आलटून पालटून करतां येईल. अशाच पध्दतीने विविध ठिकाणी नेणं किंवा विविध तज्ज्ञांना आपल्याकडे बोलावणं असं करतां येईल. आपल्या गावातल्या, वस्तीतल्या मुलांसाठी योग वर्ग, संगीत वर्ग, नाटय शिबिर असं बरंच करता येईल.
एखादी सवय बनण्यासाठी एकवीस दिवस ती कृती करावी लागते. या सुट्टीत केलेल्या उपक्रमांची, कार्यक्रमांची परिणती सवयीत होऊ शकते. या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टींचा पाया घातला जाऊ शकतो. कदाचित यातील एखादी कला, कौशल्य, छंद, सवय मुलाच्या आयुष्याला एक निराळंच वळण देऊं शकेल. आज शालेय शिक्षणाबरोबरच अशा कौशल्यांची नितांत गरज आहे. हँड (हात), हेड (मस्तक) आणि हार्ट (हृदय) यांच्या समन्वयासाठी सुट्टीतल्या बिनभिंतींच्या उघड्या शाळेचा भरपूर उपयोग करून घेऊया.