सिद्धार्थ कुंकळ्येकरांनी स्मार्ट सिटीची श्वेतपत्रिका जारी करावी

0
137

>> कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

स्मार्ट सिटी, पणजीचे संचालक सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी आतापर्यंत पणजी शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी जे काम केले त्यासंबंधीची श्वेतपत्रिका ताबडतोब जारी करावी, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. स्मार्ट सिटी पणजीच्या नावाखाली सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी लूट चालवली असल्याचा आरोपही यावेळी चोडणकर यांनी केला.

२०१५ सालापासून आतापर्यंत पणजी स्मार्ट सिटीसाठी ६०२०० कोटी रुपये एवढे बजेट मंजूर झालेले आहे. मात्र, कुठेही काहीही काम झालेले पहावयास मिळत नसल्याचे चोडणकर म्हणाले. आपण माहिती हक्क कायद्याखाली माहिती मिळवली असून कुंकळयेंकर यानी कॉर्तीना येथील पुलावर फक्त फरशा बसवण्यासाठी स्मार्ट सिटीसाठी आलेल्या निधीतून १.२० कोटी रुपये खर्च केले आहेत. शहरात विविध ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगवर केवळ पट्टे रंगवण्याच्या कामावर ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी, पणजीचे जेथे कार्यालय करण्यात आले आहे त्या जुने सचिवालय इमारतीत कार्यालयासाठी २० कोटी रुपये खर्चून फर्निचर आणण्यासाठी निविदा काढण्यात आली असल्याचे चोडणकर म्हणाले. स्मार्ट सिटीसाठी मंजूर झालेल्या निधीतून कार्यालयासाठी फर्निचर आणता येत नाही असे चोडणकर यांनी सांगितले.