बंगलोरचा पंजाबवर १७ धावांनी विजय

0
103

>> एबी डीव्हिलियर्सची धुवाधार फलंदाजी ः उमेश, सैनीचा प्रभावी मारा

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने काल बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबचा १७ धावांनी पराभव केला. बंगलोरने विजयासाठी ठेवलेल्या २०३ धावांचा पाठलाग करताना पंजाबला ७ बाद १८५ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ४३वा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात आला.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी पहिल्या गड्यासाठी केवळ ३.२ षटकांत ४२ धावांची सलामी दिली. उमेश यादवला षटकार लगावण्याच्या प्रयत्नात गेल पहिल्या गड्याच्या रुपात सीमारेषेजवळ असलेल्या डीव्हिलियर्सकडे झेल देऊन परतला. राहुलने मयंक अगरवालच्या साथीने डाव पुढे नेताना धावगती मंदावणार नाही याची दक्षता घेतली. धोकादायक ठरू पाहणारी ही जोडी स्टोईनिसने अगरवालला बाद करत फोडली. अगरवाल परतला त्यावेळी ९.१ षटकांत संघाचे शतक फलकावर लागले होते. ११व्या षटकात राहुल परतल्याने पंजाबचा संघ संकटात सापडला. याच वेळी निकोलस पूरन संघाच्या मदतीला धावला, विंडीजच्या या यष्टिरक्षक फलंदाजाने वॉशिंग्टन सुंदर व मोईन अली या बंगलोरच्या ऑफ ब्रेक गोलंदाजांना लक्ष्य करत तुफानी फटकेबाजी केली. पूरनच्या या फटकेबाजीनंतर बंगलोरचा कर्णधार कोहलीने फिरकी गोलंदाजी बंद करत वेगवान गोलंदाजांना पाचारण केले. अखेर सैनीच्या वेगासमोर पूरनने शरणागती पत्करली. त्याने २८ चेंडूंत ४६ धावांची उत्कृष्ट खेळी केली. वाढत्या आवश्यक धावगतीच्या दबावाखाली पंजाबचे गडी बाद होत राहिले. मनदीप सिंग ४ व मुरुगन अश्‍विन १ धाव करून नाबाद राहिले.

तत्पूर्वी, एबी डीव्हिलियर्सचे झंझावाती अर्धशतक (नाबाद ८२) व त्याला पार्थिव पटेल (४३) आणि मार्कुस स्टोईनिस (नाबाद ४६) यांनी दिलेल्या साथीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने २०२ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबने नाणेफेक जिंकून बंगलोरला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत पंजाबच्या गोलंदाजांनी बंगलोरच्या डावाला सुरुवातीच्या षटकांमध्येच खिंडार पाडले. पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली (१३) मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर ‘कव्हर्स’वर मनदीपकडे झेल देऊन माघारी परतला. कोहलीच्या पतनानंतर मैदानात स्मशान शांतता पसरली. यानंतर पार्थिव पटेल आणि एबी डीव्हिलियर्स यांच्यात ३६ धावांची छोटेखानी भागीदारी झाली. पार्थिवने या दरम्यान फटकेबाजी करत काही चांगले फटके खेळले. मात्र मुरुगन आश्विनच्या एका उंची दिलेल्या ‘गुगली’वर रविचंद्रन अश्‍विनकडे झेल देऊन तो माघारी परतला. पार्थिवने ४३ धावा केल्या. यानंतर मोईन अली (४) आणि अक्षदीप नाथ (३) ही झटपट माघारी परतले. त्यामुळे नवव्या षटकाअखेर बंगलोरचा संघ ४ बाद ८१ असा चाचपडत होता. संघ संकटात सापडलेला असताना एबी डीव्हिलियर्सने एका बाजूने आक्रमक खेळी करत संघाचा डाव सावरला. अखेरच्या षटकांमध्ये पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत डीव्हिलियर्सने आपले अर्धशतक साजरे केले. या फटकेबाजीमुळे काही क्षणांपूर्वी संकटात सापडलेला बंगलोरचा संघ चांगलाच स्थिरावला डीव्हिलियर्स आणि स्टोईनिस यांच्यात पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. मोहम्मद शमीच्या १९ व्या षटकात दोन्ही फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. या षटकात डीव्हिलियर्सने लागोपाठ तीन षटकार ठोकले. विलोएनने टाकलेल्या अखेरच्या षटकातही बंगलोरच्या दुकलीने दयामाया दाखवली नाही. या षटकात ३ षटकार व दोन चौकारांसह बंगलोरने २७ धावांची लूट केली. पंजाबकडून अंकित राजपूतचा अपवाद वगळता चारही गोलंदाजांनी प्रत्येकी १ बळी मिळाला.बंगलोरने या सामन्यासाठी जायबंदी डेल स्टेन व पवन नेगी यांच्या जागी टिम साऊथी व वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली. दुसरीकडे पंजाबने सॅम करन व हरप्रीत ब्रार यांना बाहेर बसवून निकोलस पूरन व अंकित राजपूत यांना संघाचे दार उघडले.

धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः पार्थिव पटेल झे. रविचंद्रन अश्‍विन गो. मुरुगन अश्‍विन ४३ (२४ चेंडू, ७ चौकार, २ षटकार), विराट कोहली झे. मनदीप गो. शमी १३, एबी डीव्हिलियर्स नाबाद ८२ (४४ चेंडू, ३ चौकार, ७ षटकार), मोईन अली त्रि. गो. रविचंद्रन अश्‍विन ४, अक्षदीप नाथ झे. मनदीप गो. विलोएन ३, मार्कुस स्टोईनिस नाबाद ४६ (३४ चेंडू, २ चौकार, ३ षटकार), अवांतर ११, एकूण २० षटकांत ४ बाद २०२
गोलंदाजी ः अंकित राजपूत ४-०-४६-०, मोहम्मद शमी ४-०-५३-१, मुरुगन अश्‍विन ४-०-३१-१, रविचंद्रन अश्‍विन ४-०-१५-१, हार्दुस विलोएन ४-०-५१-१
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल झे. साऊथी गो. अली ४२ (२७ चेंडू, ७ चौकार, १ षटकार), ख्रिस गेल झे. डीव्हिलियर्स गो. यादव २३, मयंक अगरवाल झे. चहल गो. स्टोईनिस ३५, डेव्हिड मिलर झे. डीव्हिलियर्स गो. सैनी २४, निकोलस पूरन झे. डीव्हिलियर्स गो. सैनी ४६, मनदीप सिंग नाबाद ४, रविचंद्रन अश्‍विन झे. विराट गो. यादव ६, हार्दुस विलोएन झे. पटेल गो. यादव ०, मुरुगन अश्‍विन नाबाद १, अवांतर ४, एकूण २० षटकांत ७ बाद १८५
गोलंदाजी ः टिम साऊथी ३-०-३३-०, उमेश यादव ४-०-३६-३, नवदीप सैनी ४-०-३३-२, युजवेंद्र चहल २-०-२७-०, मार्कुस स्टोईनिस २-०-१३-१, मोईन अली ३-०-२२-१, वॉशिंग्टन सुंदर २-०-२१-०