![Asian Games 2018](https://navprabha.com/wp-content/uploads/2019/04/23bajrang1.jpg)
भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने चीनच्या शियानमध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आकर्षक कामगिरी करीत सुवर्णपदक प्राप्त केले. त्याचे हे आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे सुवर्णपद होय.
अंतिम लढतीत कझाखस्तानच्या सायतबेक ओकासोव्ह याला १२-७ अशा फरकाने पराभूत करत ६५ किलो वजनी गटात पुनियाने ही सुवर्ण कामगिरी केली.
अंतिम लढतीत एकवेळ बजरंग प्रारंभी २-७ अशा पिछाडीवर पडला होता होता. परंतु त्यानंतर त्याने दमदार पुनरागम करताना लागोपाठ ८ गुणांची कमाई करीत ओकासोवला पराभूत केले व सुवर्णपदक मिळविले.
बजरंगने पहिल्या फेरीत श्रीलंकेच्या के. फर्नांडोला १०-० असे पराभूत केले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत इराणी कुस्तीपटू पेईमॅन बियोकागा बियाबानीलाही ६-० असे एकतर्फी नमविले होते. तर उझबेकिस्तानच्या सिरोजिद्दीन खासनोव्ह याला १२-१ ने असे लोळवित अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता.
अन्य भारतीय कुस्तीपटूंत प्रवीण राणाने कझाखस्तानच्या गॅलिमझन उस्सरबायव्हचा ३-२ असा पराभव करीत ७९ किलो वजनी गटातच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत राणाची गाठ इराणच्या बहमान मोहम्मद टेमौरी याच्यशी पडेल. ५७ किलो वजनी गटात रवी कुमारने रेतेचेजमध्ये तैपेईच्या चिया त्सो लियू याचा पराभव करीत कांस्यपदक प्लेऑफ फेरीत प्रवेश केला. आता पुढील फेरीत त्याची गाठ जपानच्या युकी ताकाहाशी याच्याशी पडणार आहे. ९७ किलो वजनी गटात सत्यवर्त कादियान यानेही कांस्यपदक फेरीत प्रवेश केला आहे.