![SP-BSP joint rally](https://navprabha.com/wp-content/uploads/2019/04/19maya-mulayam2.jpg)
गेल्या २४ वर्षांपासूनचे टोकाचे वैर विसरून समाजवादी पक्षाचे आधारस्तंभ मुलायमसिंह यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती काल मैनपुरी येथे एकाच व्यासपीठावर अवतरले. यावेळी बोलताना दोघांनीही एकमेकांचे भरभरून कौतुक केले. उत्तर प्रदेशच्या राजकारणातील हा ऐतिहासिक क्षण ठरला.
१९९५ मध्ये घडलेले ‘गेस्ट हाउस कांड’ हे सपा आणि बसपातील शत्रुत्वाचे प्रमुख कारण होते. मायावती यांनी त्या घटनेचा उल्लेख करतच आपल्या भाषणाला सुरुवात केली. ‘गेस्ट हाउस कांड’ हा जर इतिहास असेल तर सपा-बसपा आघाडी हे वर्तमान असून सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेऊन देशहितासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत, असे माया यांनी स्पष्ट केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी मोदी यांना देशातील मागास वर्गाबद्दल वाट असलेली काळजी ही खोटी आहे. निवडणुका असल्यामुळे त्यांना मागासलेल्या जातींचा पुळका आला आहे, असे सांगितले. मुलायम सिंह हेच मागासलेल्या जातींचे खरे कैवारी असल्याचे त्या म्हणाल्या. मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या झेंड्याखाली सर्व जातीच्या लोकांना एकत्र आणले, याबाबत कोणतेही दुमत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुलायम यांनीही मायावती यांचा स्तुतीपाठ वाचला. बर्याच दिवसांनंतर मी आणि भगिनी मायावती एकाच व्यासपीठावर आलो आहोत, याचा मला अत्यानंद होत आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांनी आमची साथ दिली आहे. माझ्यासाठी मते मागायला त्या येथे आल्यात, हे उपकार मी कधीही विसरणार नाही, असे मुलायम म्हणाले.