‘स्पीड ब्रेकर दिदींनी’ केले प. बंगालला बदनाम : मोदी

0
212

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कुच बिहारमधील भाजपच्या एका निवडणूक प्रचार सभेत पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ‘स्पीड ब्रेकर दिदी’ अशा शब्दात संभावना करीत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांवर ‘स्पीड ब्रेकर दिदींनी’ ब्रेक लगावला आहे असा आरोप मोदी यांनी यावेळी केला. शारदा घोटाळा, रोज व्हॅली घोटाळा व अन्य घोटाळ्यांमुळे ममता बॅनर्जीनी बंगालचे नाव बदनाम केल्याची टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभापासून स्पीड ब्रेकर दिदींनी प. बंगालच्या लोकांना वंचित ठेवल्याचा आरोप मोदी यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात गुंडांना रान मोकळे केले असल्याने लोकांच्या आशांवर पाणी फेरले गेले आहे असा आरोपही त्यांनी आपल्या घणाघाती भाषणात केला.
प. बंगालमधील विविध घोटाळ्यांमधून लुटण्यात आलेल्या लोकांच्या प्रत्येक पैशाबाबत हा चौकीदार (स्वत:) घोटाळेबाजांकडून हिशेब मागण्याचे आश्‍वासन आपण बंगालवासियांना देत असल्याचे मोदी यांनी सांगितले.