मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नुकतेच दक्षिण गोव्यात मडगावात पत्रकार परिषदेला सामोरे गेले. सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक दिली आणि आलेले प्रश्न परतवून लावले. लोकसभेच्या दोन्ही जागा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्वच्या सर्व जागा भाजपा जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळतानाच दुसरीकडे मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने पक्षाच्या आघाडीवर निर्माण झालेली पोकळीही भरून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. साहजिकच प्रशासनाकडे लक्ष देणे त्यांच्यासाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पक्षाच्या निवडणूक प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेणेही महत्त्वाचे बनलेले आहे. येणार्या निवडणुका हा त्यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे. आजवर पर्रीकर प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची आघाडी सांभाळायचे आणि सर्वसामान्य मतदाराच्या ह्रदयाला भिडणारी भाषणे करून आपले मुद्दे त्यांच्या गळी उतरवायचे. पर्रीकरांची ती सर्वस्वीकारार्हता भले डॉ. सावंत यांच्यापाशी नसेल, परंतु आपल्या प्रयत्नांमध्ये ते कोठेही कसूर ठेवणार नाहीत याची चुणूक गेल्या काही दिवसांतील त्यांच्या पक्ष संघटनात्मक कामगिरीतून दिसून आली आहे. वेगळ्या वाटेने जाण्याची भाषा करणार्या मगो पक्षाला त्यांच्या पक्षाने रातोरात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकद्वारे दणका देत वठणीवर आणले, त्या हादर्यातून मगो पक्ष अद्यापही सावरलेला दिसत नाही. भाजपाच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याच्या वल्गना करता करता सिंहाने अखेरीस शेपूट घातले. आपल्या विधिमंडळ गटाची भाजपाने पुरती धुळधाण उडवूनही राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचीही धमक मगो पक्ष दाखवू शकलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी भले ह्याला मगो नेत्यांची ‘प्रगल्भता’ असे संबोधले असले तरी प्रत्यक्षात ही मगोची प्रगल्भता नसून हतबलता आहे. केंद्रातील राजकीय घडामोडींवर नजर ठेवूनच मगो पक्षाने ही नामुष्कीजनक, परंतु सावध नीती अवलंबिलेली आहे. तोंड दाबून मुक्क्यांचा मार खाण्यासारखीच त्यांची स्थिती सध्या झालेली आहे. भाजपाशी उघडपणे दोन हात करण्याची क्षमता नाही, त्यामुळे मुकाटपणे सरकारला आपला पाठिंबा कायम ठेवून वाकड्यात न शिरण्याची ही धूर्त नीती आहे. आपण पाठिंबा काढून घेतला तर आपल्यामागे आयकर विभाग, सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, राष्ट्रीय तपास संस्था आदींचे शुक्लकाष्ठ लागू शकते ही मगो नेत्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलेली भीतीही अर्थातच यामागे असू शकते, परंतु सध्याची राजकीय समीकरणे कालांतराने बदलतील आणि तेव्हा आपल्याला पुन्हा सत्तेचे लाभ मिळवता येतील असा होरा ठेवूनच मगोने सध्यापुरते दोन पावले मागे जाण्याचे धोरण अवलंबिलेले दिसते. पुन्हा पुढे जाण्यासाठी सध्या दोन पावले मागे जावे लागते हे तत्त्वच त्यांंनी सध्या अंगिकारलेले आहे. मडगावच्या पत्रकार परिषदेत बोलताना आमचा पक्ष सत्तेत सामील असलेल्या गोवा फॉरवर्डला फोडणार नसल्याचे निःसंदिग्ध विधानही मुख्यमंत्र्यांनी केले. अर्थात, हे पूर्णतः राजकीय स्वरूपाचे व सावध विधान आहे. उद्या गोवा फॉरवर्डमधील दोघा आमदारांना भाजपाचे वेध लागले तर आम्ही तो पक्ष फोडलेला नाही, परंतु आमच्या पक्षाची दारे सर्वांना खुलीच आहेत असे ते म्हणू शकतात. विजय सरदेसाई यांचे उपद्रवमूल्य नियंत्रणात ठेवण्यास सध्याची राजकीय स्थिती पुरेशी आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डवर घाला घालण्याची काही आवश्यकता भाजपाला भासत नाही हे उघड आहे. परंतु पोटनिवडणुकांचे निकाल कसे लागतात, त्यातून राजकीय समीकरणे कशी बदलतात त्यावर राज्याचे राजकारण नवे रंग धारण करू शकते हेही विसरून चालणार नाही. कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्ने पाहात गुडघ्याला बाशिंग बांधून बसला आहे. पोटनिवडणुकांच्या उमेदवारीचा तिढा पक्षाने सरतेशेवटी सोडविला, त्यामुळे निकालांकडे मोठ्या आशा लावून कॉंग्रेस नेते बसले आहेत. उत्तर गोव्याच्या लोकसभा निवडणुकीत स्वतः प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत यावेळी आम आदमी पक्षानेही आपले उमेदवार उतरवून तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो. ‘आप’ ची गोव्यातील एकूण वाटचाल पाहिल्यास त्या पक्षाला चुकीचा सल्ला देणारे डाव्या विचारांचे सल्लागार खूप झाले आहेत. त्यामुळे गेल्या वेळी प्रचाराची मोठी राळ उडवूनही आजवर आपले स्थान निर्माण करणे काही केजरीवालांना गोव्यात जमले नव्हते. यावेळी त्यांना ते कितपत जमेल हे दिसणारच आहे. गोवा सुरक्षा मंचाने तर लोकसभेला मोदींना पाठिंबा आणि स्थानिक पोटनिवडणुकांत भाजपाला विरोध अशी विचित्र भूमिका घेतली आहे. या निवडणुकीत तो पक्षही आपले अस्तित्व आजमावतो आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली असल्याने ही सारी राजकीय धुमश्चक्री आता वेग घेऊ लागेल. मतदानाचा दिवस येईतो अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचे आहे, परंतु निवडणुकांचे एकूण चित्र एव्हाना स्पष्ट झालेले आहे. मतदार कौल कोणाला देतो त्याची प्रतीक्षा करूया!