
झ्युरिक
एटीपी क्रमवारीत स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल याने केवळ काही गुणांच्या अंतराने आपले पहिले स्थान राखले आहे. सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याला मागे टाकून दुसरा क्रमांक मिळविला असून यामुळे नदालच्या अव्वल स्थानाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
जोकोविचने रविवारी आपले चौथे शांघाई मास्टर्स जेतेपद पटकावले होते. या सामन्यापूर्वीच त्याने आपले दुसरे स्थान पक्के केले होते. विद्यमान विजेत्या फेडररला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. तर जोकोविचने आलेक्झांडर झ्वेरेवला हरवून अंतिम फेरी गाठली होती. अव्वल स्थानावरील नदाल व द्वितीय स्थानावरील जोकोविच यांच्यात केवळ २१५ गुणांचे अंतर राहिले आहे. फेडररची तिसर्या स्थानी घसरण झाली असून ‘टॉप १०’मध्ये अन्य कोणताही बदल झालेला नाही. युआन मार्टिन डेल पोट्रो चौथ्या व झ्वेरेव पाचव्या स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेन याने शांघाई मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून ११ क्रमांकांची सुधारणा करत ४०वे स्थान मिळविले आहे.
फ्रेंच ओपन विजेती सिमोना हालेप सलग दुसर्या मोसमात अव्वल स्थानी कायम राहणार असल्याचे डब्ल्यूटीएने काल सोमवारी जाहीर केले. रोमानियाच्या २७ वर्षीय हालेपने स्लोन स्टीफन्स हिला फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत हरवून जून महिन्यात आपले पहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते. मोसमअखेरपर्यंत ती ४० आठवडे पहिले स्थान राखण्याची कामगिरी पूर्ण करेल.
रामकुमार, सुमीतची प्रगती
पुरुष एकेरीत रामकुमार रामनाथन (+ २, १२५वे स्थान) व सुमीत नागल (+ ४, ३१२वे स्थान) यांनी प्रगती केली तर युकी भांब्री (-३, १००वे स्थान), प्रज्ञेश गुणेश्वरन (-१, १७०वे स्थान) यांना नुकसान सहन करावे लागले. दुहेरीत रोहन बोपण्णाचे तिसावे स्थान कायम आहे. लिएंडर पेस याने ८ स्थानांनी पुढे सरकताना ६१वे तर जीवन नेदुनचेझियान याने तीन स्थानांची उडी घेत ७३वे स्थान प्राप्त केले आहे.
महिला एकेरीत अंकिता रैना अव्वल २०० खेळाडूंत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. तिने पाच स्थानांची प्रगती करत २०१वे स्थान मिळविले आहे. प्रांजला येडलापल्लीने तब्बल १०९ स्थाने उडी घेत थेट ३४० वे स्थान प्राप्त केले आहे. महिला दुहेरीत प्रार्थना ठोंबरे (+ १४, १२३वे स्थान) व ऋतुजा भोसले (+ २३, २२३वे स्थान) यांनी मोठी मजल मारली आहे.
एटीपी टॉप १० ः राफेल नदाल (स्पेन, ७६६०), २. नोवाक जोकोविच (सर्बिया, ७४४५), ३. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड, ६२६०), ४. युआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेंटिना, ५८६०), ५. आलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी, ५०२५), ६. मरिन चिलिच (क्रोएशिया, ४१८५), ७. डॉमनिक थिम (ऑस्ट्रिया, ३८२५), ८. केविन अँडरसन (द. आफ्रिका, ३७७५), ९. ग्रिगोर दिमित्रोव (बल्गेरिया, ३४४०), १०. जॉन इस्नर (अमेरिका, ३२९०).
डब्ल्यूटीए टॉप १० ः १. सिमोना हालेप (रोमानिया, ७४२१), २. कॅरोलिन वॉझनियाकी (डेन्मार्क, ६४६१), ३. अँजेलिक कर्बर (जर्मनी, ५४००), ४. नाओमी ओसाका (जपान, ४७४०), ५. कॅरोलिना प्लिस्कोवा (झेक प्रजासत्ताक, ४४६५), ६. इलिना स्वितोलिना (युक्रेन, ४३५०), ७. पेट्रा क्विटोवा (झेक प्रजासत्ताक, ४२५५), ८. स्लोन स्टीफन्स (अमेरिका, ४०२२), ९. ज्युलिया जॉर्जेस (जर्मनी, ३७८५), १०. किकी बर्टेन्स (नेदरलँड्स, ३७४०).