पणजी (प्रतिनिधी)
नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रविवारी सकाळी गोव्यात परतण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पर्रीकर यांची आज सकाळी एम्समध्ये तपासणी होणार आहे. त्यानंतर डिस्चार्ज देण्यायोग्य प्रकृती असल्यास त्यांना गोव्यात जाण्यास मान्यता दिली जाईल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिल्ली येथून दिली.
मुख्यमंत्री पर्रीकर खास विमानाने आज सकाळी १० च्या सुमारास दाबोळी विमानतळावर उतरतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री पर्रीकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गेल्या १५ सप्टेंबर २०१८ रोजी खास विमानाने नवी दिल्लीला नेऊन येथील ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आजारावर उपचार सुरू करण्यात आले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर रविवारी गोव्यात परतणार आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणेकडे याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडून मुख्यमंत्र्याच्या परतण्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही.