
हैदराबाद
उमेश यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडीजला सर्वबाद ३११ धावांवर रोखल्यानंतर पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसर्या आणि शेवटच्या कसोटीत काल ४ गडी गमावत ३०८ अशी धावसंख्या उभारत मजबूत स्थिती गाठली आहे. भारतीय संघ अजून केवळ ३ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ६ फलंदाज बाकी आहेत.
काल विंडीला ३११ धावांवर रोखल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लोकेश राहुल दुसर्या सामन्यातही अपयशी ठरला. ४ धावा करून तो जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होऊन परतला. दुसर्या बाजूने पहिल्या डावातील विक्रमी शतकवीर पृथ्वी शॉ आणखी एक विक्रम प्रस्थापिक करण्याच्या मार्गावर असतानाच जोमेल वॅरिकनच्या एका चेंडूवर फसला व उचलून मारण्याच्या नादात शिमरॉन हेटमेयरकडे झेल देऊन बाद झाला. त्याला पदार्पणातच दोन्ही डावात शतक नोंदविण्याची संधी होती. परंतु ती थोडक्यात हुकली. पृथ्वीने झेल बाद होण्यापूर्वी ११ चौकार व १ षट्कारासह ५३ चेंडूत आक्रमक ७० धावांची अर्धशतकी खेळी केली. चेतेश्वर पुजारा १० धावा करून परतला. तर विराट कोहली (४५) जेसन होल्डरचा पायचितचा शिकार ठरला. ४ बाद १६२ अशा स्थितीतून फलंदाजीची सूत्रे हाती घेताना उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी काल दिवसअखेरपर्यंत आणखी गडी बाद होऊ न देता पाचव्या विकेटसाठी १४६ धावांची अविभक्त भागीदारी करीत संघाला ४ बाद ३०८ धावांपर्यंत मजबूत स्थितीत नेले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे ६ चौकारानिशी नाबाद ४५ तर युवा ऋषभ पंत १० चौकार व २ षट्कारांच्या सहाकार्याने १२० चेंडूत नाबाद ८५ धावांवर खेळत होते. विंडीजतर्फे जेसन होल्डरने २ तर शेनॉन गॅब्रिएल आणि जोमेल वॅरिकन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी सकाळी ७ बाद २९५ धावांवरून पुढे खेळताना उमेश यादवच्या भेदक मार्यामुळे विंडीजचा डाव १०१.३ षट्कांत ३११ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवसाचा नाबाद खेळाडू रॉस्टन चेजने आज आपले शतक पूर्ण केले व १०६ धावा उमेश यादवच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होऊन परतला. देवेंद्र बिशू (२) आणि शेनॉन गॅब्रिएल (०) जास्त प्रतिकार करू शकले नाहीत. भारतातर्फे उमेश यादवने ६ बळींचे घबाड मिळविले. कुलदीप यावने ३ तर रविचंद्रन अश्विनने १ गडी बाद केला.
धावफलक,
वेस्ट इंडीज, पहिला डाव ः (पहिल्या दिवसाच्या ७ बाद २९५वरून पुढे) – रॉस्टन चेज त्रिफळाचित गो. उमेश यादव १०६, देवेंद्र बिशू त्रिफळाचित गो. उमेश यादव २, जोमेल वॅरिकन नाबाद ८, शेनॉन गॅब्रिएल झे. ऋषभ पंत गो. उमेश यादव ०.
अवांतर ः ११. एकूण १०१.४ षट्कांत सर्वबाद ३११ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः ८-२९६ (देवेंद्र बिशू ९६), ९-३११ (रॉस्टन चेज १०१.३), १०-३११ (शेनॉन ग्रब्रिएल १०१.४)
गोलंदाजी ः उमेश यादव २६.४/३/८८/६, शार्दुल ठाकुर १.४/०/९ /०, रविचंद्रन अश्विन २४.२/७/४९/१, २९/२/८५/३, रविंद्र जडेजा २०/२/६९/०.
भारत, पहिला डाव ः लोकेश राहुल त्रिफळाचित गो. जेसन होल्डर ४, पृथ्वी शॉ झे. शिमरॉन हेटमेयर गो. जोमेल वॅरिकन ७०, चेतेश्वर पुजारा झे. राखीव गो. शेनॉन गॅब्रिएल १०, विराट कोहली पायचित जेसन होल्डर ४५, अजिंक्य रहाणे खेळत आहे ७५, ऋषभ पंत खेळत आहे ८५.
अवांतर ः १९. एकूण ८१ षट्कांत ४ बाद ३०८ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-६१ (लोकेश राहुल ८.४), २-९८ (पृथ्वी शॉ १८.४), ३-१०२ (चेतेश्वर पुजारा २०), ४-१६२ (विराट कोहली ४२.५)
गोलंदाजी ः शेनॉन गॅब्रिएल १३/१/७३/१, जेसन होल्डर १४/२/४५/२, जोमेल वॅरिकन २४/४/७६/१, रॉस्टन चेज ९/१/२२/०, देवेंद्र बिशू १९/४/७२/०, क्रेग बॅ्रथवेट २/०/६/०.