सरकार अस्तित्वहीन झाल्याने भ्रष्टाचारात वाढ

0
132
पणजी ः आझाद मैदानावरील कॉंग्रेसच्या जाहीर सभेवेळी उपस्थित कॉंग्रेस समर्थक.

पणजी (प्रतिनिधी)
कॉंग्रेस पक्षाने काल राजधानी पणजीत भ्रष्टाचार विरोधात जागृती मोर्चा काढून आझाद मैदानावरील जाहीर सभेत भाजप आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध सरकारी खात्यांत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. सरकारने कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेसच्या आमदारांना गृहीत धरू नये. कॉंग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचार विरोधी जागराची त्वरित दखल घेऊन सरकारी पातळीवरील कारभारात सुधारणा करावी. अन्यथा, भ्रष्टाचाराच्या विरोधातील पुढील मोर्चा अन्य ठिकाणी वळवावा लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी जाहीर सभेत बोलताना दिला.
कॉंग्रेस पक्षाने आझाद मैदानावरील आयोजित भ्रष्टाचार विरोधी जागराला गोवा प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड, फ्रान्सिस सिल्वेरा, फिलीप नेरी रॉड्रीगीस, नीळकंठ हर्ळणकर, इजिदोर फर्नांडिस, ऍन्थोनी फर्नांडिस, क्लाफासियो डायस, विल्फेड डिसा, जेनिफर मोन्सेरात, माजी मुख्यमंत्री फ्रान्सीस सार्दीन, आग्नेल फर्नांडिस, रमाकांत खलप, महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, कॉंग्रेस सेवा दलाचे गोवा प्रभारी राकेश शेट्टी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
राज्यात सरकारचे अस्तित्व जाणवत नसल्याने भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. या भ्रष्टाचाराकडे राज्यपाल आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. कॉंग्रेस पक्षाने आत्तापर्यंत शिस्तबद्धरीत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. राज्यपालांना आत्तापर्यंत सरकारी पातळीवरील गैरप्रकाराबाबत पाच वेळा भेट घेऊन माहिती देण्यात आली आहे. याकडे कवळेकर यांनी लक्ष वेधले.
सरकार खाण प्रश्‍न सोडविण्याचे केवळ आश्‍वासन देत आहे. प्रत्यक्ष कृती काहीच केली जात नाही. सत्ताधारी राजकारण्यांकडून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून स्वतःच्या तिजोर्‍या भरण्याचे काम केले जात आहे, असा आरोप कवळेकर यांनी केला.
भ्रष्टाचाराबाबत आश्‍वासनांचे
काय झाले? ः चोडणकर
भाजपने भ्रष्टाचाराला थारा न देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, या आश्‍वासनाचे पालन करू शकलेला नाही. खाण पट्टे नूतनीकरण घोटाळा प्रकरणी तक्रार करण्यात आलेली आहे. या घोटाळा प्रकरणाची कसून चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी केली. जीएसआयडीसी, स्मार्ट सिटी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. टीडीआरच्या नावाने भ्रष्टाचाराचे नवीन दुकान सुरू करण्यात आले आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.
सेझप्रकरणी मोठा
घोटाळा ः कामत
भाजप सरकारने सेझ प्रकरणी मोठा घोटाळा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू असताना सेझ प्रवर्तकांना व्याजापोटी १३२ कोटी रुपये देण्याबाबत घेतलेला निर्णय संशयास्पद आहे. राज्यात ओडीपीच्या माध्यमातून सुरू असलेला भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे, आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
तिसर्‍या मांडवी पुलाची
गरज नव्हती ः रवी
पोर्तुगीज सरकारने गोमंतकीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी सातत्याने करणार्‍या राजकारण्याला राज्यातील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पोर्तुगीज सरकारशी सामंजस्य करार करण्याची पाळी आली आहे. राज्यात तिसर्‍या मांडवी पुलाची गरज नव्हती. केंद्र सरकारच्या निधीतून हा पूल बांधला जाऊ शकला असता, असे आमदार रवी नाईक यांनी सांगितले.
आयपीबीच्या माध्यमातून
गैरव्यवहार ः रेजिनाल्ड
आयपीबीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात आहे. आयपीबीचे सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचे जाहीर करावे. दुसर्‍याच दिवशी पुराव्यासह भ्रष्टाचार उघड केला जाईल, असा इशारा आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी दिला. भाजप आघाडी सरकारकडून नियोजनात्मक पद्धतीने भ्रष्टाचार केला जात आहे, असे आमदार फिलीप रॉड्रीगीस यांनी सांगितले.
आमदार नीळकंठ हर्ळणकर, माजी मंत्री रमाकांत खलप, सार्दीन, प्रतिमा कुतिन्हो, उर्फान मुल्ला, एम. के. शेख व इतरांची भाषणे झाली. अमरनाथ पणजीकर यांनी सूत्रसंचालन केले. सभेपूर्वी कला अकादमी ते आझाद मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी भ्रष्टाचार विरोधी घोषणा देण्यात आल्या.