भारत अंतिम फेरीत दाखल

0
186

जोहोर बाहरू
भारताच्या हॉकी संघाने काल बुधवारी विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियावर ५-४ असा सनसनाटी विजय मिळवून सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील जागा निश्‍चित केली. यंदाच्या स्पर्धेतील भारताचा हा सलग चौथा विजय ठरला.
सामन्याच्या सुुरुवातीलाच भारताला पेनल्टी कॉर्नर लाभला. परंतु, याद्वारे आघाडी घेण्याची संधी भारताने दवडली. पाचव्या मिनिटाला गुरसाहिबजीत सिंग याने सुरेख मैदानी गोलद्वारे भारताचे खाते उघडले. यानंतर भारताने लागोपाठ तीन गोल करत कांगारूंचा अचंबित केले. ११व्या मिनिटाला हसप्रीत सिंग, १४व्या मिनिटाला मनदीप मोर व १५व्या मिनिटाला विष्णूकांत सिंग यांनी हे गोल करत कांगारूंच्या गोटात खळबळ उडवून दिली. पहिल्या सत्रात पूर्ण वर्चस्व गाजवल्यानंतर दुसर्‍या सत्रात मात्र भारतीय संघ गडबडला. १८व्या मिनिटाला डेमन स्टेफन्स याने भारतीय बचावफळीतील गलथानपणाचा फायदा उठवत ऑस्ट्रेलियाचा पहिला गोल केला. ३५व्या मिनिटाला त्यानेच पेनल्टी कॉर्नरचे गोलात रुपांतर करत ऑस्ट्रेलियाची पिछाडी २-४ अशी कमी केली. ४३व्या मिनिटाला शिलानंद लाक्रा याने भारताचा पाचवा गोल करताना संघाला पुन्हा तीन गोलांची आघाडी मिळवून दिली. ५९व्या व ६०व्या मिनिटाला स्टेफन्स याने लागोपाठ दोन गोल केले. परंतु, वेळ कमी असल्याने कांगारूंना बरोबरी साधणे शक्य झाले नाही. १२ ऑक्टोबर रोजी भारत आपला शेवटचा साखळी सामना ब्रिटनविरुद्ध खेळणार आहे.