पणजी
कला अकादमीत होणार्या चतुरंग नाट्यमहोत्सवात शनिवार दि. १३ रोजी दुपारी ३.३० वा. मुक्ता बर्वे व दिनू पेडणेकर निर्मित व दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित चॅलेंज हे मराठी नाटक सादर होणार आहे. क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मैत्रीवर आधारित हे नाटक आहे.
भारतीय क्रांतीलढ्यातील क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारे हे नाटक आहे. मदनलाल धिंग्रा यांचे हौतात्म्य प्रेरणादायी ठरणारे आहे. मदनलाल धिंग्रा एक क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी ब्रिटनच्या सर विलियम हर्ट कर्झन वायली यांची हत्या केली. १९०६ मध्ये मदनलाल लंडनमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मेकॅनिकल इंजिनियरिंगचा अभ्यास करण्यासाठी इंग्लडला रवाना झाले. इंग्लंडमधी त्यांचे मोठे बंधू आणि काही राष्ट्रवादी कार्यकर्ते यांचा त्यांना पाठिंबा होता. धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्याचे क्रांतिकारक वि. दा. सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात आले व अभिनव भारत चळवळीत सामिल झाले. इंडिया हाऊसमधले सावरकर सोडले तर अन्य क्रांतिकारकांचा मदनलाल धिंग्रावर संशय होता. कारण त्यांच्या थोरल्या बंधूंची ब्रिटिशांकडे उठबस होती. ते सरकारी अधिकारी होते आणि कर्झन वायलीची मुलगी मदनलाल धिंग्रांच्या प्रेमात होती. वायलीचा खून करण्याची योजना इंडिया हाऊसमध्ये आखली जाते आणि त्यात मदनलाल धिंग्रा सर्वांच्या आधी या मोहिमेसाठी तयार होतात. मदनलाल धिंग्रांवर आपण उगाच संशय घेतला असे इतरांनाही वाटू लागते. शेवटी वंदे मातरम् म्हणत मदनलाल धिंग्रा फासावर जातात आणि वंदे मातरम्च्या रण गर्जनेत नाटकाचा पडदा पडतो.
नाटकाचे लेखक दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शनातही आपले कसब दाखविले आहे. संभषणावरच या नाटकाची मदार आहे. नेपथ्य, संगीत, प्रकाश आणि कलावंतांचा कसदार अभिनय यामुळे नाटकाची कुंडली जमून आली आहे. संदेश बेंद्रे यांनी १९०९ सालचे इंडिया हाऊस उभे केले आहे. त्यास सचिन दुनाखे आणि राहुल जोगळेकरांची लाभलेली प्रकाश योजना त्या वातावरणाशी सुसंगत आहे. नुपुरा निफाडकर यांच्या पार्श्वसंगीताने नाटकास भरीवपणा आलेला आहे. निखिल राऊत यांनी साकारलेले सावरकर यथार्थपणे पेश केले आहेत. चतुर्भुजची भूमिका साकारणारे तुषार साळ, कीर्तीकरची भूमिका साकारणारे तेजस बर्वे, अय्यरची भूमिका साकारणारे पुरोहित, वर्माची भूमिका साकारणारे जयेंद्र मोरे, सेनापती बापटांची भूमिका साकारणारे शार्दुल आपटे, मदनलाल धिंग्राची भूमिका साकारणारे दिग्पाल लांजेकर, डॉली वायलीची भूमिका साकारणार्या दीप्ती लेले, आचार्याची भूमिका साकारणारे ज्ञानेश वाडेकर या सर्वांच्याच भूमिका उत्तम झाल्या आहेत. या नाटकाचे नृत्य दिग्दर्शन किरण बोरकर आणि नुपूर यांनी केले आहे.