मुलांचे आरोग्य पालकांच्या हाती

0
867
Group Of Young Children Running Towards Camera In Park Smiling

मुलांबद्दल पालकांच्या फक्त आणि फक्त तक्रारीच असतात… तीही एखाद-दुसरी तक्रार नव्हे.. तर भरपूर तक्रारी असतात. असे का बरे व्हावे??
– मुले नीट जेवत नाही… ही तक्रार सर्रासपणे सर्वच आया करतात.
– मुले सांगितल्याशिवाय अभ्यास करत नाहीत.
– मुले सतत टिव्ही पाहतात.
– त्यांना मोबाइल हवाच. त्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. अगदी पाळण्यातील बाळसुद्धा मोबाइलवर गाणं लावल्यावर शांत होते.
– अभ्याससुद्धा सोफ्यावर किंवा कॉटवर लोळूनच करतात.
– रात्री लवकर झोपत नाहीत.
आपल्या मित्रमैत्रीणींसोबत मिसळत नाहीत. अगदी एकलकोंडी झाली आहेत.
घरातही इतरांसोबत वार्तालाप कमीच.
अशा नानाविध तक्रारी घेऊन पालक दवाखान्यात येतात. त्यात काही मातांचे म्हणणे असते, ‘‘डॉक्टर, चांगली कडकडून भूक लागण्यासाठी औषध द्या व एक टॉनिक द्या बघू मुलाला’’. त्यात जरा पुढे जाऊन काही पालक कौन्सिलिंगचा विचार करतात. खरंच, भुकेच्या औषधांनी किंवा टॉनिक दिल्याने व कौन्सिलिंगने हे प्रश्‍न सुटणार का हो?
कौन्सिलिंगची खरी गरज बालकांना नसून पालकांनाच आहे, असे मी म्हणेन. बालकांच्या या सर्व तक्रारींचे मूळ आहे… आपण मुलांना लावलेल्या सवयीं! वाढ ही नैसर्गिक असते. त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे मुलांचे संगोपन हे काळजीपूर्वक व डोळसपणे व्हायला नको? पालकांनी जाणून घ्यायला हवे… मूल वाढवणे सोपे नव्हे! मुलांना घडविण्याआधी पालकांनी स्वतःला घडवायला हवे. चुकीच्या काही सवयी बदलायला हव्यात व काही सवयी लावायला हव्यात.
* मुले नीट जेवत नाहीत…!
ही तक्रार करण्यापूर्वी आपण जो आहार बालकाला देतो तो पूरक, संतुलित देतो का… याचा विचार व्हायला हवा. त्यांच्या खाण्यात बेकरी उत्पादने-बिस्किट, केक इ., फास्ट फूड, जंक फूड, पिझ्झा-बर्गर, चायनीज पदार्थ, चिकन, तळलेले-भाजलेले, विविध सॉसेस वापरून केलेले पदार्थ, पाकीट-बंद पदार्थ इदा. चिप्स, वेफर्स, शेव-चिवडा इत्यादी. बाहेरच्या गाड्यावरील चाट, शेवपुरी, पाणीपुरी, वडा-समोसा यांसारखे खाद्यपदार्थ, बाजारातील, हॉटेल-रेस्टॉंरेंटमधील असो किंवा घरात बनवलेले असो यांचा समावेश किती आहे याचा प्रत्येक पालकाने सूक्ष्मतेने विचार करावा. कारण हे पदार्थ खायला देणारे बालवयात तरी आपण स्वतः पालकच असतो. वरील सर्व पदार्थ हे फक्त जिभेला रुचकर लागतात. पोषणमूल्य किती मिळतील यात शंकाच आहे. हे पदार्थ वरचेवर खात असल्यास मूल नीट जेवणारच नाही.
– तक्रार करणार्‍या आयांकडून मुलांच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीचा आढावा घेतल्यास असे जाणवते की मुले सकाळी नाष्टाच करत नाही. शाळेत लवकर जायचे असते. कुणाच्या शाळा आणि घर यांच्यामध्ये अंतरही जास्त असते. त्यामुळे काही खात नाहीत, खाल्ले तर एखादे बिस्किट, एखादा पाव व चहा किंवा दोन मिनिटांचे मूडल्स तर आहेतच.
दुपारचे जेवण जिथे एक वाजेपर्यंत जेवायला हवे तिथे दोन-अडीच वाजेपर्यंत शाळेतून घरात पोचतात. दुपारचे जेवण अडीच वाजता म्हणजे अवेळी. जेवणाची वेळ भूकेची वेळ टळून गेल्यावर… मग मुले नीट जेवणार कशी??
– रात्रीच्या जेवणाचे तेच वांधे. संध्याकाळी ट्यूशन क्लासेस नंतर काहीतरी पालक खायला घेऊन येतात. रात्री जेवणाला उशीर होतो. दहानंतर जेवलेले पचणार कधी? रात्रीचे जेवण हे सूर्यास्तानंतर लगेच व्हायला हवे. टीव्ही, मोबाइल नसताना आठ वाजेपर्यंत सगळे जेवत होतेच.
– मुले भाज्या खात नाहीत म्हणून पदार्थ करण्याच्या पद्धतीत आयांनी ‘ट्विस्ट’ आणला आहे. यात विविध भाज्या घालून तळणाच्या पदार्थांमध्ये भर पडली. तसेच विविध विषम गुणधर्माचे मिश्रणातील पदार्थ तयार होऊ लागले, ज्यात पौषणमूल्ये र्‍हास पावली व फक्त जिभेचे चोचले पुरवले जाऊ लागले. यात विरुद्ध आहार सेवनाची सवय झाली.
* यासाठी पालकांनी थोडेसे आहार नियोजन केल्यास ….
बालक नीट जेवत नाही ही तक्रार किंवा त्याच्या आरोग्याच्या समस्याच उरणार नाहीत. आपण खातो त्या अन्नाचे काय होते… हे माहीत आहे का?- खाल्लेच्या अन्नाचे पचन व्हायला सुरुवात होते. अन्न पचल्यानंतर त्याचे अन्नरसात रुपांतर होते. या अन्नरसापासून रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा असे रुपांतर होते. म्हणजेच आपण जसा आहार घेऊ तसे आपले शरीर बनेल. शरीराच्या गरजेपेक्षा कमी खाण्याने किंवा अति खाण्यानेही शरीराचे कुपोषण होते.
वाढत्या वयात शरीराला प्रथिने, लोह, कॅल्शिअम, जीवनसत्वे, उष्मांक (कॅलरीज) या सर्व घटकांची आवश्यकता असते. ज्यांना या गोष्टी पुरेशा मिळत नाहीत, त्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. तसेच आहार नीट नसल्यास त्याचा पहिला परिणाम रक्त धातुवर होतो व ऍनिमियासारखा आजार त्रास देऊ लागतो. चेहरा पांढुरका, फिकट दिसायला लागल्यास वैद्याचा सल्ला घ्यावा. दर सहा महिन्यांनी जंताचे औषध घ्यावे. वारंवार तोंड येणे.. यासारखा त्रास असल्यास ‘ब’जीवनसत्वाचा अभाव जाणावा. बोटांच्या सांध्यांचा रंग मागच्या बाजूने काळपट गडद झाला असेल तर फॉलिक ऍसिडचा अभाव समजावा. यासाठी पालेभाज्या, वेगवेगळ्या कोशिंबिरी, हंगामी फळे रोज खावीत. भाज्या शिजवूनच घ्याव्या. भाज्यांची भजी केल्यास त्यातील पोषणमूल्ये नष्ट होतात. फलरस घेण्यापेक्षा फळे खावीत.
– मुलांना चौरस आहार मिळावा यासाठी शाळेत जाताना त्यांचा डबा विचारपूर्वक तयार केला पाहिजे. सगळ्या गोष्टी एकाच वेळी देता येत नाही, पण आठवड्याच्या डब्याचे नियोजन नक्कीच करता येते. मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी तसेच अभ्यासासाठीही उर्जेची गरज असते. ही ऊर्जा मुलांना प्रथिने व उष्मांकातून मिळत असते. त्यासाठीच मुलांनी सकाळी नाश्ता करायला हवा. नाश्त्यातून मिळणार्‍या ऊर्जेतूनच मुले अभ्यास करत असतात. म्हणूनच शाळेतसुद्धा दोन-अडीच तासाच्या अंतराने मधल्या सुट्टीचे प्रयोजन केलेले आहे. मधल्या सुटीत खाल्लेला डबा मुलांना पुढचे अडीच तास सतर्क ठेवतो. सुट्टीच्या दिवशी आहाराचे नियोजन थोडे वेगळे करावे. खेळता खेळता खाण्यासाठी ‘भूक लाडू’चे प्रयोजन करावे. गूळ-शेंगदाणे, चणे-फुटाणे, चुरमुरे, बदाम-खारीक-खजूर खाण्याची सवय लावून पहा. या पदार्थांतून ऊर्जा जास्त मिळते व मुलेही दिवसभर उत्साही, आनंदी राहतात.
मुलांना नैसर्गिकरीत्या भूक लागली पाहिजे. बळेबळे खाल्लेले पचत नाही. अन्नपचनाचा त्रास होतो. चरबी वाढते.
तर मग… आजच जाणून घ्या तुमच्या मुलांच्या आहाराच्या सवयी कशा आहेत?.. मुले वरण-भात-आमटी-भाजी-चपाती खातात की केक-नूडल्स-चायनीज-चिप्स-पास्ता मागतात? जंक फूड, फास्ट फूड, बेकरी पदार्थ हे नेहमीच्या आहाराचा भाग असता कामा नये. या पदार्थांनी पोट भरते पण कुपोषण होते.
आता ९०% ‘वर्किंग वूमेन’ असल्याने जेवण हे सकाळीच बनवले जाते. मग थोडासा ‘हटके’ विचार म्हणून मुलांना सकाळीच नाश्ता देण्याऐवजी पूर्ण जेवण जेवण्याची सवय लावल्यास काय हरकत आहे. दुपारी थंड जेवण्यापेक्षा सकाळी ताजे-गरम जेवण जेवता येईल. तसेही आयुर्वेद शास्त्रात सकाळी जेवणावरच भर दिला आहे. यासाठी मात्र लवकर उठायचीही सवय मुलांना लावावी लागेल.
दिवसाची सुरुवात मात्र चहा-बिस्किटे, हाय फायबर बिस्किटे व चहा, साधे टोस्ट व चहा किंवा चहा-चपातीने करू नये. रात्रीच्या जेवणानंतर साधारणपणे दहा ते बारा तासांच्या अंतराने असले पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा त्रास होण्याचीच शक्यता असते. तसेच यामध्ये मीठ व साखरेचे प्रमाण जास्त असल्याने विरुद्ध आहार बनतो जो शरीराला हितावह नाही.
यासाठी दुसरा पर्याय म्हणजे गूळ-तूप-चपाती रोल, भाजी-चपाती, ऑम्लेट-चपाती रोल, खूपच घाई असेल तर एखादे फळ, मूठभर सुका मेवा व पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी. शरीरात दिवसभर ऊर्जा टिकेल, उत्साह व स्फूर्ती वाढेल असा नाश्ता हवा. शरीराचे पोषण करणारे, आरोग्य सांभाळणारे, शरीराला ऊर्जा देणारे योग्य व पुरेसे सर्व घटक असलेला नाश्ता हवा.
– मुले सारखी टीव्ही बघतात, मोबाइलवर खेळतात…..
मुले आजकाल इतर खेळ खेळत नाहीत, या समस्येवरही पालकांनी स्वतःलाच सुधारायला हवे. मुले नेहमी मोठ्यांचेच अनुकरण करतात. आपण टीव्ही बघत रात्री उशिरापर्यंत जागे राहता, व्हॉट्‌सऍप किंवा फेसबुकवर झोप लागेपर्यंत असता आणि मुलांनी टीव्ही बघू नये किंवा मोबाइल वापरू नये अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही का? घरात टीव्ही चालू असताना मुलांना अभ्यास करायला सांगितल्यास कोणते मूल अभ्यास करेल? तीच गोष्ट मोबाइलची. पालकांकडे मुलांना द्यायला वेळ नसल्याने मुले कशात तरी बिझी रहावी म्हणून त्यांना मोबाइल घेऊन देणारे पालकच आहेत. किंवा ही परीक्षा टॉप कर मग तुला मोबाइल देतो म्हणून सांगणारे पालकच!! पण ही परीक्षा टॉप कर, तुला हार्मोनियम देतो, तबला-गिटार देतो, बॅट-बॉल देतो, बुद्धीबळ-कॅरम, बॉक्सिंग कीट, रॅकेट देतो.. असे सांगणारा पालक विरळाच! मुले खेळत नाही. कशी खेळतील?
आता आपले विभक्त कुटुंब- ‘हम दो – हमारा एक’. मूल खेळणार कोणाबरोबर? आपल्याबरोबर खेळेल म्हटलं तर आपल्याला वेळच नाही!!
खाणे-पिणे-जेवणे आणि झोपणे यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे खेळणे. खेळण्याचा अभाव हाच मोठा आजार आहे. मित्रमैत्रीणींसोबत खेळताना मुले सहजीवन शिकतात. दुसर्‍याला सांभाळून घ्यायला शिकतात. एक-दुसर्‍यापासून नवीन गुण, नवीन क्रिया शिकतात. देवघेव, सुसंवाद शिकतात. आई-वडलांबरोबर खेळण्याने मुलांना सुरक्षित वाटते. आपुलकी-जवळीक वाटते. मानसिक आधार वाटतो व ताणतणाव राहत नाही. म्हणूनच वेगवेगळी अभ्यासाची ट्यूशन्स लावण्यापेक्षा खेळाचा एखादा क्लास लावून बघा. कारण मुले खेळली, त्यांच्या शरीराला व्यायाम मिळाला तरच मुलांना चांगली भूक लागते व झोपही चांगली येते.
* मुलांमध्ये ताणतणाव का?….
तसे पाहिले तर थोडासा ताण येणे हे यशासाठी गरजेचे असते. कारण, आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी शरीराकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ताण होय. परंतु आपल्या आव्हान स्विकारण्याच्या क्षमतेपेक्षा ताण मोठा झोला तर मात्र समस्या निर्माण होते.
तणावामागची कारणे – मुलांना अभ्यासाबाबत भीति अथवा काळजी, कौटुंबिक कलह, स्वतःच्या शरीरयष्टीबाबतची प्रतिमा, असमानता, डावलले जाणे, सासंस्कृतिक जगातील गोष्टींचा ताण, स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा इ. गोष्टींमुळे मुलांना ताण येतो.
तणावामधील लक्षणे – किशोरवयीन मुलांवर ताण आलेला आहे, हे त्यांच्या वागणुकीतून, भावनांमधून, विचारांमधून समजून येते. मुले आपल्या मित्र-मैत्रीणींपासून दूर राहणे, नेहमी आनंद मिळवून देणार्‍या गोष्टी न करणे, आवडणारेच पदार्थ खाणे, अतिशय कमी प्रमाणात खाणे, अति झोपणे किंवा अजिबात न झोपणे, स्वभावामध्ये भावनिक चढ-उतार दिसणे… अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. मुले अतिशय मूडी बनतात. त्यांना अचानक दुःखी असल्यासारखे वाटते. आपल्या बाबतीत कुठलीच गोष्ट योग्य होत नाही… असे नकारात्मक विचार येऊ लागतात. मुले अधिक आक्रमक बनतात. अचानक अबोला धरतात. कधी कधी शाळेत जाण्याचेही टाळतात.
तणावामुळे मुलांना मन एकाग्र करणे आवघड बनते. अभ्यासामध्ये मन लागत नाही. एखाद्या गोष्टीचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि तो विचार प्रत्यक्षात आणण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे सतत गोंधळाची स्थिती जाणवते.
मुलांमध्ये ताण वाढत असतील तर, सर्वप्रथम ते समजून घेतले पाहिजे आणि मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी कुठल्याही डॉक्टर किंवा कौन्सिलरची गरज नाही. पालकांनी या कामी जागरूक राहिले पाहिजे. काही गोष्टी मुलांना आग्रहाने करायला लावल्या पाहिजेत. ताण येण्यामागे पुरेशी झोप न येणे हे कारण असू शकते. गृहपाठ, इतर ऍक्टिव्हिटीज मुले पुरेशी झोप मिळत नाही, ती पूर्ण करण्यासाठी मुलांना मदत करावी.
प्रत्येक मुलांमध्ये कुठलेतरी गुण अधिक प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये कोणते गुण आहेत, कोणत्या गोष्टीत त्यांना रस आहे, हे समजून घेण्यासाठी मुलांबरोबर वेळ घालवावा. त्यांना ज्याची आवड आहे आणि ज्या गोष्टीमध्ये गती आहे ती गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने येण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावेत. त्यांच्या क्षमता कशात आहेत हे ओळखून त्यावर लक्ष केंद्रीत करावे. मुलांचा ताण कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो आणि मन आनंदी राहते. म्हणून मुलांना… ‘व्यायाम करा, खेळा..’ असा उपदेश देण्याऐवजी त्यांच्या खेळामध्ये, व्यायामामध्ये स्वतःही सहभागी व्हावे.
मानसिक व शारीरिकदृष्ट्या ‘स्वस्थ’ असे बालक/मुले घडवणे ही काळाची गरज आहे. मुलांचा सर्वांगीण विकास करण्याकरता पालकच सतर्क व सक्षम हवेत. तक्रारी करणे सोपे पण आरोग्यपूर्वक जीवन मुलांना देऊन त्यांना घडवणे पूर्णतः… पालकहो… आता तुमच्याच हाती!