शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील : आमदार सोपटे

0
119

पेडणे (न. प्र.)
शेतकरी शेती उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह चालवत असतात. विविध कृषियोजना कार्यरत असल्या तरी त्या वाढवण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार भविष्यात अधिक योजना मिळवून देण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार आहे. शेतकर्‍यांनी कृषी योजनांचा लाभ घेऊन पडीक शेती ओलिताखाली आणावी असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी सावंतवाडा, मांद्रे येथे केले.
पेडणे तालुका शेतकरी सोसायटीच्या भात कापणी व मळणी यंत्राच्या शुभारंभ प्रसंगी आमदार श्री. सोपटे बोलत होते. यावेळी पेडणे कृषी विभागाच्या अधिकारी प्रणीता देसाई, पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद केरकर, उपाध्यक्ष संतोष मळीक, संचालक शांबा सावंत, संचालक गजानन शेट कोरगावकर, कार्यकारी संचालक गोपाळ सावंत, आबा सावंत, माजी सरपंच नामदेव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी अधिकारी प्रणीता देसाई यांनी भात कापणी मळणी यंत्र योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकर्‍यांनी आपापली कागदपत्रे शेतकरी सोसायटीकडे देण्याचे आवाहन केले. आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर लगेच अनुदान देण्याची प्रक्रिया मार्गी लावता येते असे त्यांनी सांगितले.
पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचे चेअरमन मिलिंद केरकर म्हणाले की, पेडणे तालुक्यातून पेडणे तालुका शेतकरी सोसायटी भात खरेदी करते. पूर्ण तालुक्यातून ५०० टन भात खरेदी केले जाते. त्यांपैकी केवळ एका मांद्रे गावातून २५० टन भात खरेदी केले जाते. त्यावरून मांद्रे गावातील शेतकरी शेतीला किती प्राधान्य देतात हे लक्षात येते. शेतकर्‍यांच्या गरजा लक्षात घेऊन सोसायटीने स्वत:चे कापणी व मळणी यंत्र कृषी खात्याच्या सहकार्याने खरेदी केले आहे. पूर्वी पूर्ण तालुक्यात भात कापणी, मळणी व नांगरणी केली जायची. आता केवळ मांद्रे गावासाठी संस्थेने हे यंत्र कार्यरत केले आहे. शेतकर्‍यांच्या वाढत्या मागणीनुसार आणखी दोन यंत्रे भाडेपट्टीवर घेतली जात असून केवळ तासासाठी २२०० रुपये शुल्क आकारण्यात येतात. त्यांपैकी १२०० रुपये शेतकर्‍यांनी भरायचे असतात तर १००० रुपये अनुदान सरकार देते. मात्र, सोसायटी शेतकर्‍यांकडून १२०० ऐवजी १००० रुपयेच वसूल करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरपंच राजवी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला चेअरमन मिलिंद केरकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन गजानन शेट कोरगावकर यांनी तर उपाध्यक्ष संतोष मळीक यांनी आभार मानले.