- आनंद इंगळे, अभिनेता
मराठी रसिकांना विजय चव्हाण यांची ओळख खर्या अर्थानं झाली ती ‘मोरुची मावशी’ या नाटकामुळं. आचार्य अत्रेंनी लिहिलेल्या या नाटकातील विजय चव्हाण यांनी साकारलेली रांगडी, पुरुषी दिसणारी मावशी प्रेक्षकांना मनापासून भावली. या नाटकामध्ये असणारं ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणं आणि त्यातील मावशीची धमाल अदाकारी आजही डोळ्यासमोर चटकन येते.
आजूबाजूला कुणी काही बोलत असेल, टिकाटिप्पणी करत असेल, गॉसिपिंग करत असेल तर तो ङ्गक्त हसायचा. पण प्रतिक्रिया म्हणून कधीही वाईट बोलायचा नाही. त्याच्यातलं हे अस्खलित माणूसपण, सच्चेपण मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्याच्या विनोदाचं सामर्थ्य त्याचा स्वभाव हेच होतं.
शेवटच्या काळात केलेल्या एका चित्रपटाच्या वेळी तर विजू मामाची प्रकृती ठीक नव्हती; पण ऑक्सिजन लावून घेऊन तो सेटवर गेला आणि त्यानं शुटिंग पूर्ण केलं होतं. कामाविषयी असणारी ही कटिबद्धता खूप महत्त्वाची असते.
कोणत्याही कलाकाराचं जाणं हे कलाक्षेत्रासाठी नुकसानदायकच असतं. पण विजय चव्हाण यांचं जाणं हा माझ्यासारख्या कलाकारांचा ‘पर्सनल लॉस’ आहे असं मला वाटतं. नव्या पिढीसाठी तो सदैव हेल्पिंग हँड, मार्गदर्शक राहिला. कलाकार म्हणून त्यांच्या अभिनयाच्या छटा प्रेक्षकांनी पाहिल्या आणि आस्वादल्या आहेतच, त्याला मनमुराद दादही दिली आहे; पण विजू मामा इतक्या निखळपणानं आणि सरळ विनोद करू शकायचा कारण माणूस म्हणूनही तो तितकाच निखळ आणि साधा होता. साहाय्यक अभिनेत्याला एका उंचीवर नेऊन ठेवणार्या या अङ्गलातून आणि चतुरस्र कलाकाराला श्रद्धांजली वाहताना मन खूप जड होतं आहे.
गेल्या चार दशकांपासून मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटांच्या क्षेत्रात आपल्या अनोख्या अभिनयशैलीने एक वेगळं स्थान निर्माण करणार्या विजय चव्हाण यांच्या जाण्यानं मराठी कलासृष्टीची खूप मोठी हानी झाली आहे. मराठी रसिकांना विजय चव्हाण यांची ओळख खर्या अर्थानं झाली ती ‘मोरुची मावशी’ या नाटकामुळं. मराठी नाटकांच्या इतिहासात सुपरडुपर हिट ठरलेल्या आणि प्रेक्षकांना मनमुराद हसायला लावणार्या या नाटकाचंही एक वेगळं स्थान आहे. आचार्य अत्रेंनी लिहिलेल्या या नाटकातील विजय चव्हाण यांनी साकारलेली रांगडी, पुरुषी दिसणारी मावशी प्रेक्षकांना मनापासून भावली. या नाटकामध्ये असणारं ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणं आणि त्यातील मावशीची धमाल अदाकारी आजही डोळ्यासमोर चटकन येते. विजय चव्हाणांनी अशा अनेक नाटकांमधून अभिनय केला. चित्रपटाच्या क्षेत्रात तर सुमारे ३५० हून अधिक सिनेमांमधून ते झळकले.
विजय चव्हाणांना आम्ही कलाकार विजू मामा म्हणायचो. मी आजवर एकाच चित्रपटामध्ये काम केलं होतं; पण त्याची अनेक नाटकं मी पाहिलेली आहेत. ‘मोरुची मावशी’ हे नाटक पहातच आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यानंतर विजू मामा जेव्हा आयुष्यात आला तेव्हा अनेक गोष्टींचा उलगडा झाला. मुख्य म्हणजे तो इतक्या निखळपणानं आणि सरळ विनोद करू शकतो कारण माणूस म्हणूनही तो तितकाच निखळ आणि साधा होता. अनेकदा निधनानंतर गेलेल्या माणसाविषयी चांगलं सांगायचं म्हणून त्याच्या व्यक्तिमत्त्वात नसलेले गुण सांगितले जातात. पण असं काहीही न करता मला हे आवर्जून नमूूद करावं लागेल की विजू मामा हा स्वच्छ मनाचा आणि मनात कधीही कोणाचंही वाईट न चिंतणारा होता. अतिशयोक्ती नव्हे तर मी खरोखरीच त्याच्या तोंडून एखाद्याविषयी एकदाही वाईट काही बोललेले ऐकलेले नाही. आजूबाजूला कुणी काही बोलत असेल, टिकाटिप्पणी करत असेल, गॉसिपिंग करत असेल तर तो ङ्गक्त हसायचा. पण प्रतिक्रिया म्हणून कधीही वाईट बोलायचा नाही. त्याच्यातलं हे अस्खलित माणूसपण, सच्चेपण मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्याच्या विनोदाचं सामर्थ्य त्याचा स्वभाव हेच होतं. तो अत्यंत निखळ होता, तसाच खट्याळही होता. पण या खट्याळपणामध्ये कुणालाही दुखावण्याचा अथवा पातळीहीन चेष्टा करण्याचा लवलेशही नसायचा. महाराष्ट्राला त्याची ‘मोरुची मावशी’तील मावशी म्हणून ओळख असली तरी ‘टुरटूर’, ‘तू तू मैं मैं’, ‘श्रीमंत दामोदरपंत’मधील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहणारा आहे.
मोरुची मावशी हा त्याच्या आयुष्यातला कळसाध्याय होता. या नाटकानं विजू मामाला ओळख दिली हे खरं असलं तरी त्यामध्ये त्याचं डेडीकेशनही तितकंच होतं. एकाच दिवसात या नाटकाचे तीन-तीन प्रयोग केलेले मी पाहिले आहे. विशेष म्हणजे यातील शेवटच्या म्हणजेच तिसर्या प्रयोगाच्या वेळीही त्याच्यातला उत्साह तसाच विलक्षण असायचा, त्याच्या अभिनयाचा दर्जा जराही कमी झालेला नसायचा. आजच्या काळात अनेक सुखसोयी, सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत; पण आजच्याइतकी सुखेनैवता नसतानाच्या काळातही विजू मामा तीन प्रयोगांचं हे शिवधनुष्य लीलया पेलायचा.
आजच्या काळात अनेक पुरुष कलाकार स्री व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. त्या प्रामुख्याने विनोदी बाजाच्या असतात. पण या सर्वांपेक्षा विजू मामानं साकारलेली मावशी सरस आणि उजवी वाटते. याचं कारण त्यानं भूमिकेचा राखलेला आब होय. त्यानं कधीही त्याचं काम अश्लील होऊ दिलं नाही. तो स्री वेशात कधीही अश्लील दिसला नाही. या भूमिकेचं ग्लॅमर त्यानं जपलं. त्याचा दर्जा त्यानं जपला. स्रीभूमिका करताना अनेकदा अचकट विचकट हावभाव केले जातात. बरेचदा ते स्रियांनाही लाजवणारे असतात. पण विजू मामाचं काम पाहताना कुठल्याही पुरुषाला अथवा स्रियांना आनंद व्हायचा. त्याच्या या भूमिकेचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपण पुरुष असून आपण स्रीचा वेश घेतला आहे याची बॉर्डरलाईन तो अङ्गलातून सांभाळायचा. आपण कथानकाची अथवा नाटकातील परिस्थितीची गरज म्हणून तात्पुरते स्रीचे कपडे परिधान केले आहेत हे त्याच्या हावभावातून, अभिनयातून अत्यंत चपखलपणानं दिसायचं.
विजूमामानं नव्या पिढीतील कलाकारांसोबतही काम केलं. केदार शिंदेसोबत त्यानं अनेक चित्रपट केले. पण भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांसारखे नवोदित विनोदी अभिनेते पुढे येत असताना विजूमामानं आब राखून आपली जागा धरली. हे नवे कलाकार पुढे येत असताना काय करायचं हे त्याला अचूक माहीत होतं. त्यामुळंच तो यापिढीसाठी सदैव हेल्पिंग हँड राहिला. त्यानं नेहमीच मार्गदर्शकाची, पाठबळ देणार्याची भूमिका घेतली. हे त्याचं स्वभाववैशिष्ट्य खूप सुखावणारं होतं.
मराठी सिनेरसिकांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराङ्ग, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकरांच्या चित्रपटांचा काळ अनुभवला आहे. त्याकाळात हे सर्व कलाकार तुङ्गान लोकप्रिय होते. विजू मामाने लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं; पण या सर्व चित्रपटातून विजय चव्हाण हे नाव कायम वेगळंच राहिलं. लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर अनेक नट आले आणि गेले; पण तशा नटांमध्ये विजूमामा कधीही नव्हता. त्याचा सहाय्यक अभिनेता नायकाच्या जोडीनेच विनोद करायचा, त्याच्यावर जळायचा, त्याच्याविरुद्ध कारस्थान रचायचा, कधी त्याचा पचका व्हायचा, तर कधी तो नायकाचा सर्वोत्तम मित्र म्हणून समोर यायचा. पण आपल्या चतुरस्त्र अभिनयाने त्यानं सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. महेश कोठारेंच्या ‘झपाटलेला’ चित्रपटातील भूमिका मला विशेष आवडली.
शेवटच्या काळात केलेल्या एका चित्रपटाच्या वेळी तर विजू मामाची प्रकृती ठीक नव्हती; पण ऑक्सिजन लावून घेऊन तो सेटवर गेला आणि त्यानं शुटिंग पूर्ण केलं होतं. कामाविषयी असणारी ही कटिबद्धता खूप महत्त्वाची असते. त्यानं कधीच कोणत्याही भूमिकेत भेदभाव केला नाही. कोणतीही भूमिका लहान अथवा मोठी समजली नाही. स्वभावातील चांगुलपणामुळे आज मराठी इंडस्ट्रीत त्याच्याविषयी त्याच्या माघारी वाईट बोलणारं कोणीही आढळणार नाही. त्यामुळं विजू मामाचं जाणं हा ‘पर्सनल लॉस’ आहे.