माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन शुक्रवार २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.१५ वाजता मांडवी आणि झुवारी नदीत करण्यात येणार आहे.
माजी पंतप्रधान दिवंगत वाजपेयी यांच्या अस्थीचे दोन कलश बुधवारी गोव्यात आणण्यात आले आहेत. या अस्थिकलश दर्शन यात्रेला गुरूवारी दोन्ही जिल्ह्यांत सुरुवात करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील पणजी, पर्वरी, साळगाव, कळंगुट, शिवोली, मांद्रे, पेडणे, म्हापसा, थिवी या भागातून कलशदर्शन यात्रा पूर्ण करण्यात आली आहे. तर दक्षिण गोव्यातील काणकोण, कुंकळ्ळी, केपे, सांगे, कुडचडे, सावर्डे, शिरोडा व फोंडा या भागात कलश यात्रा काढण्यात आली आहे.
अस्थिकलश यात्रा २४ रोजी उत्तर गोव्यातील डिचोली, मये, साखळी, वाळपई, प्रियोळ, कुंभारजुवा मतदारसंघातून काढण्यात आल्यानंतर संध्याकाळी ५.१५ वाजता अस्थिकलशाचे पणजी येथे मांडवी नदीत विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच दक्षिण गोव्यातील फातोर्डा, नावेली, मडगाव, कुठ्ठाळी, झुवारीनगर, मुरगाव, वास्को या भागात दर्शन यात्रा काढण्यात आल्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता कुठ्ठाळी येथे अस्थिकलशाचे झुवारी नदीत विसर्जन करण्यात येणार आहे.