आव्हान उभारणीचे

0
172

पुराने कहर केलेल्या केरळमधील परिस्थिती पावसाने थोडी उसंत घेतल्याने हळूहळू का होईना, पूर्वपदावर येऊ लागली आहे. धरणांची दारे उघडल्याने नद्यांचे दुथडी भरून वाहणारे पाणीही हळूहळू ओसरू लागले आहे. मदत छावण्यांमध्ये आश्रयाला गेलेले नागरिक आपल्या घरादारांमध्ये परतू लागले आहेत. घरांत भरलेला गाळ उपसू लागले आहेत. गेलेल्या चीजवस्तूंचा अंदाज घेऊ लागले आहेत. पुन्हा नव्याने शून्यातून उभे राहण्यासाठी धडपडू लागले आहेत. एका महाआपत्तीनंतर केरळला पुन्हा सावरायचे आहे. अशा आपत्ती कधी सांगून येत नसतात. ही आपत्तीही पूर्वसूचना देऊन आली नव्हती. त्यामुळे लक्षावधी बेसावध नागरिक तिच्या तडाख्यात सापडले. पण एक गोष्ट मात्र या सार्‍या संकटात तीव्रतेने जाणवली ती म्हणजे आपद्ग्रस्तांमधील शिस्त, संयम आणि सामंजस्य. खरोखरच अत्यंत कौतुकास्पद अशी ही बाब आहे. मदतकार्यात त्यामुळे अडथळे पोहोचू शकले नाहीत आणि कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक लोकांना मदत पोहोचू शकली, अन्न वस्त्र निवार्‍याची सोय होऊ शकली. उत्तरेकडील काही राज्यांत अशी आपत्ती आली असती तर मदत सामुग्रीची लुटालूट हमखास पाहायला मिळाली असती, उत्तराखंडमध्ये घडले तसा संधीचा गैरफायदा घेत लुटणार्‍यांच्या झुंडीही दिसल्या असत्या, परंतु साक्षरतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या केरळने सुसंस्कृतेचाही आदर्श देशाला या आपत्तीच्या प्रसंगी दाखवून दिला आहे. ज्या प्रकारे तेथील सामान्यांतील सामान्य माणसांनी या आपत्तीच्या प्रसंगी मदतकार्यात वाहून घेतले, ज्या प्रकारे केरळच्या मच्छीमारांनी आपत्ती निवारणात मदत पथकांना अहोरात्र सहाय्य आणि सहकार्य दिले ते केवळ अजोड आणि अद्वितीय आहे. महिलांना मदत पथकाच्या बोटीत चढता यावे म्हणून थेट पुराच्या पाण्यात ओणवा झालेल्या आणि आपल्या पाठीची पायरी करून देणारा मल्लापुरमचा जैस्वाल केपी हा या निःस्पृहपणे मदतकार्यात झोकून दिलेल्या मच्छीमारांचा एक प्रातिनिधिक चेहरा म्हणावा लागेल. अशा हजारो मच्छीमारांनी आपापल्या नावा पुराच्या पाण्यात लोटून जे मदतकार्य केले, त्याला तोड नाही. तीच गोष्ट एनडीआरएफच्या जवानांची आणि तिन्ही सैन्यदलांच्या मदतपथकांची. घरांच्या टेरेसवरील अपुर्‍या जागेत स्वतःचा जीव धोक्यात घालून कमालीच्या कौशल्याने हेलिकॉप्टरे उतरवणारे, ठिकठिकाणी अडकलेल्यांना दोराच्या साह्याने वर खेचून घेणारे वैमानिक काय, अहोरात्र पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना बाहेर काढणारे एनडीआरएफचे जवान काय, कोसळलेले पूल आणि रस्ते यांची तात्पुरती डागडुजी करून संपर्क प्रस्थापित करणारे सैनिक काय, ज्या शिस्तीत आणि वेगाने केरळमध्ये मदतकार्य चालले आहे ते प्रशंसनीय आहे. फक्त एकच गोष्ट खटकली ती म्हणजे हेलिकॉप्टरमधून चाललेल्या मदतकार्याचे व्हिडिओ नौदल, हवाई दलाने जारी करणे ही त्या आपद्ग्रस्तांची क्रूर थट्टा आहे. आपण कसे जीव वाचवले याची शेखी मिरवण्यासाठीच जर हे व्हिडिओ प्रसृत केले जात असतील, तर हा प्रकार त्वरित थांबवला गेला पाहिजे. ही वेळ श्रेय उपटण्याची नाही. निःस्पृहपणे मदत करण्याची आहे. राज्य सरकारने आपली यंत्रणा प्रभावीपणे कामाला लावल्याचे दिसून आले. विशेषतः ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी यंत्रणेने सैन्यदलांच्या आणि एनडीआरएफच्या मदतीने आपत्ती निवारणाचे शिस्तबद्ध काम केले. परंतु या आपत्तीची व्यापकता लक्षात घेता केरळची पुनर्उभारणी हे फार मोठे आव्हान यानंतरच्या काळात असेल. पूर ओसरल्यानंतर रोगराईची भीती असते. तो धोका तर आहेच, परंतु विस्थापित झालेल्यांचे संसार पुन्हा सावरणे, शून्यातून पुन्हा सारे उभे करणे हे आव्हान मोठे आहे. साडेसात लाख लोक मदत छावण्यांत आले होते. ज्यांची घरे शाबूत आहेत ते परततील, परंतु इतरांचे काय हा प्रश्न आहेच. राज्याची एकूण हानी वीस हजार कोटींची असावी असा अंदाज ‘असोचॅम’ ने व्यक्त केलेला आहे. सत्तावीस हजार घरे कोसळली आहेत, पंचेचाळीस हजार एकर शेतजमीन पाण्यात नापीक झाली आहे, १३४ पूल कोसळले आहेत, सोळा हजार कि. मी. चे साबांखाचे रस्ते आणि ८२ हजार कि.मी. चे स्थानिक रस्ते संपूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत त्या वेगळ्याच. या सगळ्या आपत्तीच्या भयावहतेचा नेमका अंदाज येण्यास आणखी थोडा वेळ लागेल, परंतु शेवटी या राखेतून पुन्हा फिनिक्सप्रमाणे उभे राहायचे आहे. केरळला सध्या अन्न वस्त्राची आवश्यकता नाही, परंतु विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी तांत्रिक सहाय्याची मोठी गरज आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले. तेही खरेच आहे. संपर्क यंत्रणा, वीजपुरवठा, रस्ते, रेल्वे हे सगळे वेगाने पुनःप्रस्थापित करणे हे सरकारसमोरील खरे आव्हान आहे. अशा आपत्तीनंतर मदतकार्याचा ओघ येतो, परंतु त्यामध्ये उपयुक्ततेचा विचार केला जातोच असे नाही. अनेकदा तर आपण मदतकार्य केले ही शेखी मिरवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी संस्थांकडून देखावा केला जातो. प्रत्यक्षात पूरग्रस्तांच्या गरजा जाणून घेऊन त्याप्रमाणेच मदतकार्य झाले आणि ते योग्य, प्रामाणिक यंत्रणांमार्फत झाले तरच ते सार्थकी लागेल.