मुसळधार पाऊस व पुरामुळे आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेलेल्या केरळमधील पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पॉप फ्रान्सिस यांनी आंतरराष्ट्रीय जनसमुदायाला केरळातील पूरग्रस्तांना मदत करण्याची हाक दिली आहे. शनिवारी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० कोटींची मदत जाहीर केली होती. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला असून राज्य सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे.
महाराष्ट्र सरकारने केरळला तातडीची २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पुण्यातून सात लाख लीटर पाणी रेल्वेने पाठवले जाणार आहे. गुजरात येथून १४ लाख ५० हजार लीटर पाण्याचे वॅगन पाठवले जाणार आहे.
पुरामुळे काल आणखी १३ जणांचे बळी गेले. अलुवा, चालकुडी, चेनगन्नूर, अलप्पुझा, पथनमथिट्टामध्ये परिस्थिती बिकट आहे. एनडीआरएफ, लष्कर, नौदल आणि कोस्ट गार्डचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. आतापर्यंत त्यांनी ३८ हजारांपेक्षा लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. २३ एनडीआरएफची १६९ पथके काम करीत असून काल त्यांनी १५ हजारांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित जागी हलविले. २२ हेलिकॉप्टर, नौदलाच्या ४० बोटी, कोस्ट गार्डच्या ३५ बोटी अडकून पडलेल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात गुंतल्या आहेत. या शिवाय स्थानिक तरुण, पोलीस तसेच मच्छीमार मदतकार्यात सहकार्य करीत आहेत.