बजरंगला गोल्ड

0
160

अंतिम फेरीत जपानच्या ताकातानी दायची याचा कडवा प्रतिकार ११-८ असा मोडून काढत भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया याने भारताला १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पूनियाने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना उझबेकिस्तानच्या खासानोव सिरोजुद्दिन याचा पहिल्या फेरीत तांत्रिक वर्चस्वाच्या आधारे १३-३ असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पूनिया प्रारंभी ०-३ असा पिछाडीवर पडला होता. त्याने प्रतिआक्रमण करताना सलग सहा गुण घेताना ६-३ अशी आघाडी घेतली. या हल्ल्यामुळे भांबावलेल्या प्रतिस्पर्ध्याने यानंतर अधिक प्रतिकार केला नाही. त्यामुळे बजरंगने ‘अंतिम ८’मध्ये स्थान मिळविले. उपांत्यपूर्व फेरीत तर बजरंगने कमाल करताना ताजिकिस्तानचा फैझियेव अब्दुलकासिम याला १२-२ असे लोळविले. पहिल्या सत्रात ९-२ अशी आघाडी घेतल्यानंतर बजरंगने दुसर्‍या सत्रात सावध पवित्रा अवलंबताना ३ गुण घेतले. बजरंगने उपांत्य फेरीत मंगोलियाचा बातमागनाय बातचुलून याला १०-० असे अस्मान दाखवून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता.