जातीनिहाय राखीवतेत कोणताही बदल करण्याचा आपल्या सरकारचा विचार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी स्पष्ट केले. तसेच एनआरसीच्या विषयावरून कोणाही भारतीयाला देश सोडावा लागणार नाही असेही त्यांनी काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. देशाच्या विविध भागांत जमावाकडून होणार्या मारहाणीच्या घटनांवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. अशा घटनांचे समर्थन होऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जातीनिहाय राखीवतेत बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. त्यामुळे याविषयी कोणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने हीच देशाची ताकद आहे. सबका साथ, सबका विकास या उद्देशाप्रमाणे आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. याद्वारे देशातील गरीब, पीडित, मागास, आदिवासी, दलित तसेच ओबीसी समाजाचे हित जपणे आमच्यासाठी गरजेचे आहे.
देशात अलीकडे जमावाकडून होणार्या मारहाणीच्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. मात्र या विषयावरून कोणी राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले. त्यापलीकडे जाऊन शांतता निर्माण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत (एनआरसी) मोदी यांनी सांगितले की ज्यांची नावे या यादीत नाहीत त्यांना आपले नागरिकत्व सिध्द करण्याची पूर्ण संधी देण्यात येईल.