मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काल पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये हिंसक वळण लागले. औरंगाबादमध्ये ६० औद्योगिक कंपन्यांची तोडफोड केल्याचा दावा कंपन्यांच्या अधिकार्यांनी केला आहे. तर मुंबईत मराठा आंदोलकांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.
पुण्यात कोथरूड डेपोजवळ दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. औरंगाबादेत वाळुज एमआयडीसीत २ खासगी वाहने व पोलीसांची एक गाडी पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मुंबई – पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्याने महामार्ग सुमारे सहा तास ठप्प होता. पुण्यात बंदला चांदणी चौकात दगडफेक करणार्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. नांदेडमध्ये दगडफेक करण्यात आली.
कदंब महामंडळाला फटका
महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या कालच्या जेलभरो आंदोलनामुळे राज्यातील कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला महाराष्ट्रातील सावंतवाडी, रत्नागिरी, मालवण, कोल्हापूर, पुणे या भागात जाणार्या बसगाड्या बंद ठेवाव्या लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच गोवा ते मुंबई, पुणे दरम्यान वाहतूक करणार्या खासगी बसमालकांना नुकसान सहन करावे लागले. महाराष्ट्रात जाणार्या बसगाड्या बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. कदंब वाहतूक मंडळाकडून महाराष्ट्रातील अनेक भागात बसगाड्या पाठविल्या जातात. महाराष्ट्रात जाणार्या कदंब मंडळाच्या काही बसगाड्या दोडामार्ग आणि पत्रादेवी येथील सीमेपर्यंत वाहतूक करीत होत्या.