डिचोलीची शान ः नूतन वाचनालय

0
336
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

रविवार दि. १२ ऑगस्ट हा ग्रंथपाल दिन म्हणून साजरा झाला. गोव्यामध्ये शहरा-शहरांतून शतकमहोत्सव पार केलेली समृद्ध ग्रंथालये आहेत. शतकोत्तर वाटचाल समर्थपणे करीत आहेत. याच परंपरेतील एक आहे डिचोलीचे नूतन वाचनालय. त्याची ही यशोगाथा –

शंभर वर्षांपूर्वी डिचोली परिसरात वाचनालयाच्या अभावामुळे वाचकांना पुस्तकांसाठी शहराबाहेर जावे लागायचे. ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी वाचन हे महत्त्वाचे साधन मानले जायचे. त्यामुळे आपल्या परिसरात वाचनालय हवे, तसेच शैक्षणिक सेवेचे आणि वाचन संस्कृती विकसित करण्याचे माध्यम हवे म्हणून समाजात ज्ञानाचा प्रसार व्हावा या व्यापक हिताच्या उद्देशाने समविचारी व्यक्तींना बरोबर घेऊन डिचोलीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जयवंतराव सूर्यराव सरदेसाई यांनी १९१३ साली ‘नूतन वाचनालया’ची डिचोलीत स्थापना केली. सुंदरपेठ येथे सध्याच्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या प्रकाश शिरोडकर यांच्या दुकानासमोरच्या वास्तूत या वाचनालयाचा कारभार चालायचा. गोव्यात त्यावेळी पोर्तुगीज राजवट असल्यामुळे वाचनालयाची नोंदणी बिल्बीओताक मॉडर्न अर्थात नूतन वाचनालय या नावाने झाली. पुढे वाचनालयाचे स्थलांतर काही वर्षांनंतर पेट्रोल पंपासमोरच्या गोवेकर हॉटेलच्या माडीवर करण्यात आले. पुढे शांतादुर्गा हायस्कूलच्या इमारतीत वाचनालयाला कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून देण्यात आली.

जयवंतराव सरदेसाई हे स्वतः एक नामवंत साहित्यिक आणि काही वर्षे त्यांनी पत्रकारिता केल्यामुळे वाचनालयाची उपयुक्तता त्यांनी जाणली होती. त्यामुळे त्यांनी कठीण परिश्रम घेऊन स्वतःकडे असलेली पुस्तके आणि इतरांकडून दान स्वरुपात स्वीकारून संग्रहित केली आणि या वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. डिचोली परिसराची साहित्यिक आवड जपण्याचा तसेच वाचक आणि ग्रंथ यामधील दुवा बनण्याचा हा प्रवास तसा सोपा नव्हता, परंतु जिद्दीने अक्षरशः शून्यातून सुरू झालेला हा अभिनव प्रयोग शतकमहोत्सवी वाटचालीची यशस्वी मालिका करणारा ठरला. त्यामुळेच कोणतेही अनुदान नसतानाही कोणत्याही काळात हा प्रवास मुळीच खंडित न होता गेली १०५ वर्षे हे वाचनालय डिचोली शहराच्या इतिहासाशी जोडले गेले आहे.
डिचोली शहरात पुढच्या काळात ‘अशोक वाचनालय’ आणि ‘बाफ फुटबॉल क्लब’चे वाचनालय अशी दोन खाजगी संस्थांची वाचनालये आणि डिचोली तालुका ग्रंथालय हे सरकारी अशी तीन वाचनालये अस्तित्वात आली. पुढे दूरदर्शन, चित्रपट आणि मनोरंजनाच्या इतर वाढत्या साधनांमुळे वाचन संस्कृतीला घरघर लागली. वाचनालयाचे सदस्य बनून पुस्तक वाचणार्‍यांची संख्या घटू लागली. त्यामुळे ‘अशोक वाचनालय’ आणि ‘बाफ क्लब’चे वाचनालय तग धरू न शकल्यामुळे कालांतराने बंद पडली, परंतु प्रतिकुल परिस्थितीतही ‘नूतन वाचनालय’ दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहिले. त्या काळी सरकारी अनुदान अगदीच तुटपुंजे असल्याने वाचनालय समितीच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तसेच सभासदांच्या वार्षिक वर्गणीतून आणि दात्यांच्या मदतीने जवळजवळ ९५ वर्षे वाचन संस्कृती जपण्याची मोलाची भूमिका त्या वाचनालयाने बजावली.

२००७ सालापासून शासनाने ग्रंथालयाचा कारभार चालवण्यासाठी भरीव अनुदान देण्यास प्रारंभ केला आणि खर्‍या अर्थाने गोव्यातील ग्रंथालये बहरू लागली. शासन कृष्णदास शामा राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथालयांना अनुदान देत आहे. सध्या नूतन वाचनालय विद्यावर्धक मंडळाच्या अधिपत्याखाली येत असून त्याच्या कारभाराची धुरा संचालक मंडळ सांभाळत आहे. वाचनालय समितीचे अध्यक्षपद मोरेश्‍वर जोशी भूषवित असून सचिवपदी अर्जुन मळगावकर आहेत, तर गुरुदास झांट्ये खजिनदारपदाची धुरा सांभाळत आहेत. आनंद शिरोडकर, लखू परब, कै. कांचन नाबर, श्री. तेली, दिगंबर पेडणेकर, महेश नाईक, विजय पावसकर, ब्रिजेश चणेकर, सौ. अनिता परब वाडकर यांनी वाचनालयात ग्रंथपाल म्हणून परिपूर्ण सेवा दिली. सध्या रंजिता गावठणकर या ७ वर्षांपासून ग्रंथपालपदाचा कार्यभार सांभाळत असून अवधुत आकेरकर हे सहायक म्हणून कार्यरत आहेत. वाचनालयात १३०० सभासदांची नोंदणी झाली असून ग्रंथांची संख्या १० हजारांपर्यर्ंत आहे.
वाचनालय जुने असल्याने अनेक अत्यंत जुने दुर्मिळ ग्रंथ इथे उपलब्ध आहेत. हा दुर्मिळ खजिना इथे जतन केला आहे. वाचनकक्षाला रोज ४० ते ५० वाचक भेट देत असतात. ग्रंथालयाचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत चालते. वाचनालयाला वर्षातून केवळ ३ सुट्‌ट्या असतात. बाकीचे ३६२ दिवस वाचनालय वाचकांसाठी खुले असते.

वाचनालयात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. पुस्तकदिन, ग्रंथपालदिन साजरे केले जातात. ग्रंथपालदिनानिमित्त शाळकरी मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. ग्रंथपालदिनी दर्जेदार व्याख्या ऐकण्याचे तसेच अन्य कार्यक्रम पाहण्याची संधी वाचकांना मिळाली. या दिवशी वाचनालयाचे नियमित सभासद आणि वाचकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येतो.

वाचकांच्या बदलत्या गरजा आणि आवडी लक्षात घेऊन वाचनालयाने आपल्या कारभारात बदल करून सुसूत्रता आणली. वाचकांचे अभिप्राय आणि सूचना स्वीकारून मागणीनुसार पुस्तके मागवली जातात, तसेच पुस्तके भेट स्वरुपात स्वीकारली जातात. राजा राममोहन रॉय वाचनालय, कलकत्ता या संस्थेतर्फे नित्य पुस्तके पुरवली जातात. बदलत्या काळानुसार समाजाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. यात वाचनसंस्कृतीच्या झालेल्या घसरणीमुळे अनेक ग्रंथालयांची पिछेहाट झाली. मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही नूतन वाचनालयाने आपले अस्तित्व कायम राखले याचे मोठे श्रेय वाचनालयाचे भूतपूर्व सचिव बाळकृष्ण (तातो) चणेकर यांना द्यावे लागेल. त्यांनी अत्यंत धडाडीने निःस्वार्थीपणे स्वतःचा बहूमुल्य वेळ खर्च करून, मेहनत घेऊन वाचनालयाला नवचैतन्य दिले. नूतन वाचनालय हा त्यांचा श्‍वास आणि ध्यास आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नूतन वाचनालय हे १५० वर्षांची परंपरा लाभलेल्या विद्यावर्धक मंडळाच्या वास्तूत मारुती मंदिराच्या बाजूला विसावले आहे. मंदिराचे पवित्र वातावरण आणि बाजूला शाळकरी मुलांचा उत्साही वावर असतो. २०१५ साली मंदिराबरोबरच वाचनालयाच्या वास्तूचे पुनःनिर्माण करून सुशोभीकरण करण्यात आले. यात अनेक दात्यांनी सढळ हस्ते मदत केली. वाचनालयाच्या या सुशोभीकरणात नवप्रभाचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांचा मोलाचा वाटा आहे. वाचनालयाने त्यांच्या या योगदानाबद्दल वाचनकक्षाचे वाळवे वाचन विभाग असे नामकरण केले.

वाचनालय हे केवळ वाचन करण्याचे साधन आणि ग्रंथांचे दालन नसून ते एक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्याचे साधन म्हणून त्याला महत्त्व आहे. समाजाच्या जाणिवांचे, पर्यायाने उद्याच्या पिढीचे भावविश्‍व त्यातून समृद्ध नक्कीच होते. थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने आणि वाचकांच्या उदंड प्रेमाने मोठ्या जिद्दीने नूतन वाचनालयाने वाचन संस्कृतीचा हा वारसा पिढ्यान्‌पिढ्या जपला आहे याचा आम्हा समस्त डिचोलीवासियांना अभिमान आहे.