भारत ‘अ’ला विजयाची संधी

0
123

दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धचा चारदिवसीय अनधिकृत सामना एका डावाने जिंकण्याच्या दिशेने भारत ‘अ’ संघाने मार्गक्रमण केले आहे. पहिला डाव ८ बाद ५८४ धावांवर घोषित केल्यानंतर दुसर्‍या डावात पाहुण्यांची ४ बाद ९९ अशी स्थिती झाली आहे. पहिल्या डावात केवळ २४६ धावांपर्यंत मजल मारलेला द. आफ्रिकेचा संघ अजून २३९ धावांनी पिछाडीवर असून आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे.

तत्पूर्वी, दुसर्‍या दिवसाच्या २ बाद ४११ धावांवरून काल पुढे खेळताना भारत ‘अ’ची सुरुवात चांगली झाली नाही. मयंक अगरवाल (२२०) याला आपल्या धावसंख्येत एकाही धावेची भर घालता आली नाही तर अय्यर वैयक्तिक २४ धावा करून माघारी परतला. हनुमा विहारी (५४) व यष्टिरक्षक फलंदाज भरत (६४) यांनी अर्धशतके लगावताना पाहुण्यांना हैराण केले. सिराजच्या रुपात आठवा गडी परतल्यानंतर कर्णधार अय्यरने भारताचा डाव घोषित केला. अक्षर पटेल ३३ धावांवर नाबाद राहिला. पाहुण्यांकडून ब्युरन हेंड्रिक्सने ९८ धावांत ३, दुआने ऑलिव्हरने ८८ धावांत २ व ऑफस्पिनर डॅन पिद याने ९२ धावांत २ गडी बाद केले.

दुसर्‍या डावात द. आफ्रिकेकडून प्रतिकाराची अपेक्षा होती. परंतु, सिराजने भन्नाट मारा करत पाहुण्यांना ठराविक अंतराने दणके दिले. सिराजने त्यांची आघाडी फळी कापून काढत ३ बाद ६ अशी केविलवाणी स्थिती केली. झुबेर हमझा (नाबाद ४६) व सेनुरन मुथुस्वामी (४१) यांनी चौथ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली. दिवस संपण्यास काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना सिराजने मुथुस्वामीला तंबूचा रस्ता दाखवत भारतासमोरील मोठा अडसर दूर केला.