देशाच्या विकासात जसे शेतकर्यांचे योगदान आहे तसेच उद्योगपतींचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे उद्योगपतींनाही योग्य तो सन्मान मिळायला हवा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काल केले. त्यांच्या हस्ते येथील विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
देशाच्या जडणघडणीत बँक कर्मचारी, औद्योगिक कामगार, मजूर, सरकारी कर्मचारी आदींचे भरीव योगदान मिळत असते. त्याचप्रमाणे उद्योगपतींचेही योगदान या कामी महत्वाचे असते. मात्र उद्योगपतींसंदर्भात अनेकदा अपशब्द वापरले जातात हे योग्य नाही असे मोदी म्हणाले.
कोण कोणाच्या विमानातून प्रवास करतो याची माहिती आम्हाला आहे. जो चुकीचे वागेल त्याला देश सोडावा लागेल किंवा त्याला तुरुंगात जावे लागेल असा दावा त्यांनी केला.
या संदर्भात पुढे मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. जे उद्योगपतींच्या शेजारी उभे राहण्यास घाबरतात त्यांच्याप्रमाणे आम्ही नाही असा टोला त्यांनी लगावला. ज्यांचा उद्योगपतींबरोबर फोटो नाही अशा लोकांना आपण पाहिले असेल. मात्र असे असले तरी अशा लोकांनी देशातील एकाही उद्योगपतींचा उंबरठा झिजवलेला नाही अशी स्थिती नाही. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अमर सिंह यांच्याकडे अंगुली निर्देश करून मोदी म्हणाले, ‘अमरसिंह तुम्हाला अशा नेत्यांचा सर्व इतिहास सांगतील’.