>> मडगावातील सभेत मागणी
>> राज्यभरात जागृती करणार
परप्रांतातून फॉर्मेलीनयुक्त मासळी घेऊन गोव्यात येणार्या ट्रकांवर कायमची बंदी घालावी व त्यासाठी जे कोण जबाबदार असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काल मडगाव येथे आयोजिलेल्या नागरिकांच्या जाहीर सभेत करण्यात आली. या फॉर्मेलिनयुक्त मासळी विरोधात गावोगावी सभा घेऊन जागृती करण्याचेही सभेत जाहीर करण्यात आले.
या सभेत ऍड. राधाराव ग्रासियश, ऍड. ऍनाक्लेत व्हियेगस, डॉ. जोर्सन फर्नांडिस, ऍड्रीक कुर्रेया, संजिव रायतूरकर व इतरांची भाषणे झाली. ऍनाक्लेत व्हियेगस यांनी सांगितले की, फॉर्मेलिन घालून मासे आयात करून विक्री करणे हे खुनाच्या कलमाखाली येते. त्याना संरक्षण देणारे लोकप्रतिनिधीही तेवढेच जबाबदार आहेत. पैसे कमावण्यासाठी असले धंदे करणारे गुन्हेगार आहेत. गोमंतकीय प्रामाणिक असून ते जीवाशी खेळत नाहीत, असे ते म्हणाले.
ऍड. राधाराव ग्रासियश यानी सरकारने फक्त एक ऑगस्टपर्यंत आयात मासळीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ही बंदी १५दिवसांऐवजी कायम घालावी व आंध्र प्रदेश, चैन्नई व अन्य राज्यातून गोव्यात येणार्या मासळीवर फॉर्मेलिन घातले जाते हे सिद्ध झाले असून, सरकारला त्यावर बंदी घालण्याचा पूर्ण अधिकार आहे. गेल्या ४० वर्षांत अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करून गुन्हे दाखल केले. पण कोणालाच शिक्षा झाली नाही. यावरून या प्रशासनाच्या कारभाराची कल्पना येते. या संदर्भात जागृती करण्यासाठी गावोगावी जागृती सभा घेणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयात मांसही धोकादायक ः आश्विनीजी
परराज्यांतून गोव्यात आयात होणार्या मांसावर टिकून राहण्यासाठी रसायनाचा वापर करण्यात येत असल्याचे ध्यान फांऊडेशनचे योगी आश्विनीजी यांनी सांगून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
आयात होणार्या मांसाची कडक तपासणी करावी. आयात मांसात सोडियम न्यायट्रेट, इ३२० व इ३१६ अशा रसायनांचा वापर केला जातो. हे मास गोव्यात आणताना शीतपेटीचा वापर न करता उघड्या वाहनातून गोव्यात आणले जाते व ग्राहकाना विकले जाते. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. तो आणण्यासाठी ३६ अटी आहेत. पण त्याचे पालन केले जात नाही. सरकारने त्याची गंभीर दखल घ्यावी व फॉर्मेलिनयुक्त मासळीवरही कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले.