येत्या मंगळवारी आणखी ७ नव्या १०८ रुग्णवाहिका आणण्यात येणार असून त्यात अत्याधुनिक अशा व्हेंटिलेटर्सची सोय असेल अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
या रुग्णवाहिकांत काम करण्यासाठी युवक-युवतींना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी दिली. गोवा शिपयार्डने एक रुग्णवाहिका दिलेली असून ती चिखली येथील इस्पितळाजवळ ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
१०८ रुग्णवाहिकेचा काणकोण येथे आणिबाणी कक्ष सुरू करण्यात येणार असून १२ जुलै रोजी त्याचा शुभारंभ होणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
मोटरसायकल रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ‘मर्क’ कंपनीने सरकारला ५० लाख रु. चा निधी दिलेला असून हा निधी खर्च करून या रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी दिली. खाण भागात ग्रामीण वैद्यकीय केंद्रे सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती राणे यांनी यावेळी दिली. बाणावली व पर्ये मतदारसंघात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.