रेशन दुकानदारांना कमिशन वाढविण्यावर विचार ः गावडे

0
251

राज्यातील स्वस्त धान्य दुकानात पीओएस यंत्रणा बसविण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे. पीओएस यंत्रणेबाबत स्वस्त धान्य दुकान मालकांच्या काही समस्या असल्यास त्यावर निश्‍चित तोडगा काढला जाईल. दुकान मालकांना कमिशन वाढवून देण्यावर विचार केला जात आहे, अशी माहिती नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली.

पीओएस यंत्रणा बसविण्याच्या विरोधात काही जणांनी निवेदन सादर केले आहे. दुकान मालकांच्या प्रश्‍नावर विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल. पोओएस यंत्रणा बसविण्याच्या प्रश्‍नावरून माघार घेतली जाणार नाही, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.

स्वस्त धान्य दुकानातून होणार्‍या धान्याच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पीओएस यंत्रणा बसविण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.
देशभरात स्वस्त धान्य दुकानात पीओएस यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. राज्यात केवळ साडे चारशे स्वस्त धान्य दुकाने असून सुद्धा पीओएस यंत्रणा बसविण्याच्या बाबतीत मागे आहे. हरयाणा सारख्या राज्याने सर्व स्वस्त धान्य दुकानात पीओएस यंत्रणा कार्यान्वित केली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.