राष्ट्रपती कोविंद आज गोव्यात

0
108

>> विद्यापीठाचे पदवीदान व नागरी सत्कार

गोवा विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज गोव्यात आगमन होत आहे.
आज दुपारी १२ वाजता बांबोळी पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार्‍या या सोहळ्यात राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यावेळी अध्यक्षस्थानी असतील. सन्माननीय पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे हजर असतील.

संध्याकाळी ५ वाजता दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात गोवा सरकारतर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

सुरक्षेसाठी १ हजार पोलीस
राष्ट्रपतींचे आज गोव्यात आगमन होत असल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी १ हजार पोलीस असतील. दाबोळी विमानतळ ते गोवा विद्यापीठ या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात येणार असून राष्ट्रपतींच्या आगमनाच्या वेळी ठिकठिकाणी वाहतूक अडवून ठेवण्यात येणार आहे.