
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात पाहुण्या बांगलादेशचा ४३ धावांत खुर्दा उडाला आहे. वेगवान गोलंदाज किमार रोच याने केवळ ८ धावांत ५ गडी बाद करत बांगलादेशी आघाडी फळी कापून काढली. यानंतर जेसन होल्डर (२ बळी) व मिगेल कमिन्स (३ बळी) यांनी आपली कामगिरी चोख बजावताना बांगलादेशचा डाव १८.४ षटकांत संपवला.
बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दास याने सर्वाधिक २५ धावांचे योगदान दिले. यानंतर रुबेल हुसेनने केलेल्या नाबाद ६ धावा दुसर्या क्रमांकाच्या सर्वाधिक ठरल्या. कसोटी क्रिकेटमधील मागील ४४ वर्षातील ही निचांकी धावसंख्या ठरली. १९७४ साली इंग्लंडविरुद्ध लॉडर्सवर भारताचा डाव ४२ धावांत संपला होता. यानंतर एवढी कमी धावसंख्या नोंद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
यजमान वेस्ट इंडीजने चहापानाच्या वेळेपर्यंत ३२ षटकांच्या खेळात बिनबाद ९० धावा केल्या होत्या. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट (४०) व डेव्हन स्मिथ (४८ धावा) नाबाद खेळपट्टीवर होते. बांगलादेशने या सामन्यात अबू जायेदला कसोटी पदार्पणाची संधी दिली. अबू हा त्यांचा ८८वा कसोटीपटू ठरला.