चांदरमधील घरफोडीत लाखोंचा ऐवज लुटला

0
133

>> वृध्द दांपत्याला केली जबर मारहाण : दोघाही चोरट्यांना अटक

गिरदोली-चांदर येथे ज्योकीम इस्तिबेरो (७५) यांच्या घरांत काल रविवारी पहाटे चार वाजता बुरखा घातलेल्या सशस्त्र दोघा अज्ञातांनी घुसून ज्योकीम व त्यांच्या पत्नीला जबर मरहाण करून रोख व दागिने मिळून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. या मारहाणीत ज्योकीम इस्तिबेरो व त्यांची पत्नी मारिया इस्तिबेरो (६८) दोघेही जखमी झाले असून, त्याना ऑस्पिसियु हॉस्पिटलांत दाखल करण्यात आले आहे. इस्तिबेरो यांचे घर गिरदोली येथे रेल्वे मार्गानजीक आहे. दरम्यान पोलिसांनी उशिरा दोघाही चोरट्याना अटक केली.

ज्योकीम इस्तिबेरो आपल्या घराच्या तळमजल्यावर राहतात. वरच्या मजल्यावर तीन खोल्या बनवून त्या भाड्याने दिल्या असल्याचे सांगण्यात आले. घरात हे ज्येष्ठ नागरिक दोघेच राहात आहेत. काल पहाटे ४ वाजता दोघे बुरखा घालून आत घुसले. त्यांच्या हातात धारधार सुरे होते असे जखमी इस्तिबेरो यांनी सांगितले. चोर मागचा दरवाजा तोडून आत घुसले आणि दागिने, पैसे मागू लागले. मात्र ते देण्याची तयारी नसल्याचे पाहून त्यांनी ज्योकीमच्या तोंडावर बुक्यांनी मारहाण केली व सूरा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कपाटांतील सोन साखळी, मास्कॉत, अंगठी व रोख रक्कम बळजबरीने काढली. तसेच मारियाने अंगावरील साखळी, अंगठी असे दागिने काढून दिले. जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती घाबरली होती.

चोरट्यांनी मारिया हिलाही मारहाण करून सुरा हाताला लावला. त्यामुळेही ती जखमी झाली. त्या दोघांवर ऑस्पिसियुत उपचार चालू आहेत. सुर्‍याचा धाक दाखवून चोरट्यांनी खोलीतील, कपाटांतील कपडे, सामान अस्ताव्यस्त केले व जाताना स्वयंपाक सिलींडर, टी. व्ही. संच अशा वस्तूही नेल्या व बाहेरून कडी लावून ते पळाले. इस्तिबेरो यांच्या घरात चोरटे घुसून चोरी झाल्याचे शेजार्‍यांनाही समजले नाही. सकाळी १० वाजता कोणीतरी कडी काढून पाहिले असता चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी हे वृत्त समजताच मायणा कुडतरी, पोलिसह स्टेशनचे निरिक्षक वस्त, उपअधिक्षक राजू राऊत देसाई यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली. या घटनेमुळे गिरदोली येथे भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासो डायस यांनी येथे भेट देऊन पहाणी केली. चोरांनी ज्येष्ठ नागिरकांना मारहाण करून दागिने, पैसे लुटले तसेच टी. व्ही. संच सिलिंडर चोरले ही भयंकर घटना आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दोघाही चोरट्यांना अटक
या चोरीप्रकरणी पोलिसांनी अन्वर शेख व सिकंदर शेख (दवर्ली) यांना अटक केली. अन्वर याच्याकडून सुरा व सोन्याचे दागिने, सिलींडर हस्तगत करण्यात आले. पोलिस उपअधिक्षक राजू राऊत देसाई यांच्या प्रयत्नांमुळे चोर सापडला.
अन्वर व दुसरा आरोपी या दोघांनी घराची कौले काढून आत प्रवेश केला. वरती चढण्यासाठी खुर्चीचा वापर केला व मागचा दरवाजा उघडला. दोघांनी ज्योकीम इस्तिबेरो व त्यांची पत्नी या दोघांवर सुरीने वार केल्याचे सांगितले. ज्योकीमच्या दोन्ही हात, पाय व पोटावर सुर्‍याच्या जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी चोरी बरोबरच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही चोरट्यांवर नोंदवण्यात आला आहे.