
स्वीडनने मेक्सिकोचा ३-० असा पराभव करत फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जाने अँडरसनच्या स्वीडनने आक्रमक खेळाचे दर्शन घडवताना ‘एफ’ गटात अव्वल स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला. पराभवानंतरही मेक्सिकोने गटात दुसरा क्रमांक मिळवून बाद फेरी गाठली.
सामन्याच्या पहिल्या सत्रात आक्रमक पवित्रा अवलंबूनही स्वीडनला खाते उघडण्यासाठी दुसर्या सत्राची वाट पहावी लागली. लुडविग ऑगोस्टिनसन याने ५०व्या मिनिटाला मेक्सिकोच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत संघाचे खाते उघडले.
मेक्सिकोच्या हेक्टर मोरेनो याने स्वीडनच्या बर्ग याला अवैधरित्या पाडल्याने रेफ्रींनी स्वीडनला पेनल्टी बहाल करताना मोरेनोला बाहेरचा रस्ता दाखवला. ६२व्या मिनिटाला मिळालेल्या या पेनल्टीवर आंद्रेयास ग्रानक्विस्ट याने गोल केला. एडसन आल्वारेझने ७४व्या मिनिटाला स्वतःच्या जाळीत गोल मारल्याने स्वीडनला ३-० असा विजय मिळाला.