कर्णधार हॅरी केनने नोंेदविलेल्या दोन गोलांमुळे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने नवख्या ट्युनिशियाला २-१ असे पराभूत करण्यात यश मिळविले. या सामन्यात ट्युनेशियाने इंग्लंडला बरेच झुंजविले. ९० मिनिटांपर्यंत त्यांनी इंग्लंडला १-१ असे बरोबरीत रोखले होते. परंतु इंज्युरी वेळेत केनच्या हेडरने इंग्लंडला तारले. अन्यथा त्यांना १-१ असे बरोबरीत समाधान मानावे लागले असते.
कर्णधार हॅरी केनने ११व्या मिनिटाला गोलरक्षकाकडून रिबाउंड होऊन परत आलेल्या चेंडूला जाळीची दिशा दाखवित इंग्लंडचे खाते खोलले होते. तर ३५व्या मिनिटाला ट्युनिशियाला पेनल्टी मिळाली. गोलचा पहिला प्रयत्न गोलरक्षकाने रोखला, मात्र त्याचवेळी गोलकिपरकडून आलेल्या बॉलला पुन्हा गोलपोस्टकडे सरकवत फर्जानी सॅसीने गोल नोंदवित ट्युनिशियाला बरोबरी साधून दिली. ९०व्या मिनिटापर्यंत ट्युनिशियाने इंग्लंडला बरोबरीत रोखले होते. परंतु इंज्युळी वेळेत त्यांच्या बचावपटूकडून चूक झाली आणि इंग्लंडला कॉर्नर किक मिळाला. त्याचा पुरेपुर लाभ उठविताना हेरी केनने हेडरद्वारे गोल नांेंदवित संघाला पूर्ण गुण मिळवून दिले.