स्वीडनचा कर्णधार आंद्रेस ग्रॅन्कविस्टने दुसर्या सत्रात पेनल्टीवर नोंदविलेल्या गोलमुळे स्वीडनने दक्षिण कोरियावर १-० असा निसटता पराभव करीत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल विजयी सलामी दिली.
पूर्वाधात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. दोन्ही संघांनी या सत्रात गोल नोंदविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही.
दुसर्या सत्रात ६५व्या मिनिटाला स्वीडनने केलेल्या एका धोकादायक चालीवर डी कक्षेत व्हिक्टर क्लासॉनला दक्षिण कोरियाच्या किम मिन-वू याने धोकादायकरित्या चुकीच्या पद्धतीनं टॅकल केले. यावेळी पेनल्टी द्यायची की नाही याचा निर्णय घेण्यासाठी रेफ्रीनं व्हीएआर अर्थात व्हीडियो असिस्टंट रेफ्रीचा वापर केला. त्यानंतर रेफ्रीनं स्वीडनला पेनल्टी किक बहाल केली. स्वीडनचा कर्णधार आंद्रेस ग्रॅन्कविस्टने कोणतीही चूक न प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकविण्यात यश मिळविले. हाच स्वीडनच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा सामन्यातील एकमेव गोल ठरला.
या विजयामुळे स्वीडनने १९५८ नंतर फिफा विश्वचषकात प्रथमच विजयी सलामी दिली आहे. त्यावेळी स्वीडनने मेक्सिकन संघावर ३-० अशी एकतर्फी मात केली होती आणि यावेळीही हे दोन्ही संघ एकाच गटात ‘फ’मध्ये आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही संघांच्याखात्यात प्रत्येकी तीन गुण जमा झाले आहेत. गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकन संघाने १-० असे निसटते पराभूत केले आहे. त्यामुळे जर्मनी आणि दक्षिण कोरियाला आपले खाते खोलायाचे आहे.