पर्रीकरांकडून धडाक्यात कामकाज सुरू

0
158

>> सोमवारी घेणार मंत्रिमंडळ बैठक

>> कुलदेवता-ग्रामदेवतेचे घेतले दर्शन

सुमारे १४ आठवडे अमेरिकेत उपचार घेऊन नुकतेच गोव्यात परतलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पर्वरी येथील राज्य सचिवालयातील आपल्या कार्यालयात जाऊन धडाक्यात कामाला सुरुवात केली. गेले तीन महिने न झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठकही सोमवार दि. २५ जून रोजी घेण्याचे त्यांनी निश्‍चित केले. वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर संध्याकाळी उशिरा त्यांनी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन चर्चा केली. तत्पूर्वी, त्यांनी सकाळी माशेल येथील मंदिरात जाऊन आपल्या श्री देवकीकृष्ण कुलदेवतेचे आणि पणजीची ग्रामदेवता महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर बैठक
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २५ जून रोजी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे ठरवले आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. सचिवालयात पर्रीकर यांनी काल मुख्य सचिव व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्था याविषयी त्यांच्याशी चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्या.

सहकार्‍यांकडून विचारपूस
काल पर्रीकरांनी कामाचा ताबा घेतल्यानंतर त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व राज्य प्रशासनाविषयी त्यांच्याशी चर्चाही केली. विनोद पालयेकर, रोहन खंवटे, मॉविन गुदिन्हो, गोविंद गावडे, बाबू आजगावकर, जयेश साळगावकर, विश्‍वजित राणे आदी मंत्री तसेच सभापती प्रमोद सावंत तसेच काही आमदारांनीही काल त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

केवळ सात तासच काम
करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
पर्रीकर यांच्यावर अमेरिकेत उपचार केलेल्या डॉक्टरांनी त्यांना कामाचा जास्त ताण न घेण्याचा व दिवसभरात केवळ सात तासच काम करण्याचा सल्ला दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्रीकर हे काटेकोरपणे या सल्ल्याचे पालन करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. विधानसभा अधिवेशन १९ जुलैपासून
राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान घेण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व सभापती प्रमोद सावंत यांनी घेतला. त्यासंबंधीची फाईल काल सरकारने राज्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना पाठवली. अधिवेशनासंबंधीची अधिसूचना राज्यपाल सोमवारी काढणार आहेत. हे अधिवेशन एकूण १२ दिवसांचे असेल.

जनतेच्या आशीर्वादामुळे पुनरागमन : पर्रीकर
जनतेच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी देवाकडे केलेल्या प्रार्थनेमुळे पुन्हा गोव्यात येऊन कामकाज सुरू करणे शक्य झाले. जनतेचे आशीर्वाद असेच कायम राहतील अशी अपेक्षा आहे. गोव्याचा विकास आणि लोककल्याणासाठी आपले कार्य सदैव चालूच राहणार असल्याचे पर्रीकर यांनी तमाम गोमंतकीयांना उद्देशून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.

ताणाचे काम देणार नाही : भाजप
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर शारीरिक तसेच मानसिक ताण पडेल, असे कोणतेही काम भाजप त्यांच्यावर नजीकच्या काळात सोपवणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल सांगितले. त्यांना सध्या विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात येणार नाही, असे तेंडुलकर म्हणाले.