जोस गिमेझिनने सामन्याच्या अंतिम क्षणात नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर उरुग्वेने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल इजिप्तवर १-० अशी निसटती मात करीत शानदार विजयी सलामी दिली. इजिप्तला त्यांचा स्टार स्ट्रायकर महंमद सलाहची उणीव जाणावली. सलाह दुखापतीमुळे या सलामीच्या सामन्यात खेळाडू शकला नाही. सलाहला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत खांद्याला दुखापत झाली होती.
या विजयामुळे जागतिक १४व्या स्थानावरील उरुग्वेने आपल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आपला सलामीचा सामना जिंकण्यात यश मिळविले. तर १९९०नंतर विश्व क्रमांक ४५व्या स्थानावरील इजिप्तशियन संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. दोन्ही संघ पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीत राहिले होते. या सत्रात उरुग्वेने खेळावर बव्हंशी वर्चस्व राखले होते. परंतु इजिप्तचा बचावही तेवढाच वाखाणण्याजोगा होता. त्यांनी उरुग्वेचे बरेच हल्ले परतवून लावले. उरुग्वेच्या कव्हानी आणि सुआरेझला या दोन्ही स्टार स्ट्रायकर्सना इजिप्तच्या बचावफळीने जखडून लावले होते. १६व्याच मिनिटाला उरुग्वेला फ्री-कीक मिळाली होती. परंतु ती वाया गेली. त्यानंतर २३व्या मिनिटाला कव्हानीने सोपी संधी गमावली.लगेच पुढच्या २४व्या मिनिटाला सुआरेझने उरुग्वेला आघाडी मिळवून देण्याची संधी गमावली. २९व्या मिनिटाला सुआरेझला पुन्हा एकदा संघाचे खाते खोलण्याची संधी चालून आली होती. परंतु त्याने ती गमावली.
दुसर्या सत्रात दोन्ही संघांनी गोल नोंदविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु सामन्याच्या अंतिम क्षणापर्यंत ते यशस्वी झाले नव्हते. त्यातच उरुग्वेला ८९व्या मिनिटाला फ्री-कीक मिळाली. सांचेझने डाव्या विंगेतून घेतलेल्या या फ्री-कीकवर जोस गिमेझिनने हेडरद्वारे गोल नोंदवित संघाचा शुभारंभी सामन्यातील विजय साकारला. विजयामुळे उरुग्वेने पूर्ण ३ गुणांची कमाई केली.