>> रशियाची सलामी; सौदी अरेबियाचा धुव्वा
डेनिस चेरीसहेवने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर यजमान रशियाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या शुभारंभी सामन्यात सौदी अरेबियाचा ५-० असा धुव्वा उडवित शानदार विजयी सलामी दिली. काल मॉस्कोच्या लुज्निकी स्टेडिअवरील सामन्याने फुटबॉलचा महाकुंभ मानल्या जाणार्या विश्वचषक-२०१८ स्पर्धेस शानदार कार्यक्रमाने सुरुवात झाली.
सुमारे ८० हजार फुटबॉल चाहत्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत कालच्या शुभारंभी सामन्यात यजमान रशियन संघाने आक्रमक खेळ करीत पूर्ण सामन्यात बव्हंशी वर्चस्व राखले होते. त्यांनी सौदी अरेबियन संघाला बचावफळी भेदण्याच्या जास्त संधीच दिल्या नाहीत. स्ट्रायकर आलेक्झेंटर गोविनच्या क्रॉसवर २८ वर्षीय युरी गाजिंस्कीने सामन्याच्या प्रारंभीच १२व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल नोेंदवित यजमानांचे खाते खोलले. हा गोल नोंदवित गाजिंस्कीने यंदाच्या विश्वचषकातील पहिला गोल करण्याचा मान मिळवला. त्यानंतर सौदीचा कर्णधार अल मुनिफला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती. परंतु त्याने घेतलेल्या हेडरवरील फटका रशियन बचावपटू फेडोर स्मोलोवला लागून बाहेर गेला.
दुखापतीमुळे रशियाचा आघाडीपटू ऍलन डझोएयेवला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याच्या स्थानी आलेल्या डेनिस चेरिशेव्हने ४३व्या मिनिटाला गोल नोंदवित गोल नोंेदवित रशियाला पहिले सत्र संपण्यापूर्वी २-० अशा आघाडीवर नेले.
दुसर्या सत्रातही रशियन संघाने घरच्या प्रेक्षकांच्या पाठबळाचा फायदा उठवित आपले आक्रमण चालूच ठेवताना आणखी ३ गोल नोंदविले. या सत्रात सौदी अरेबियानेही एक-दोन संधी निर्माण केल्या होत्या. परंतु त्यांना त्यांचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. ७१व्या मिनिटाला रशियाने तिसरा गोल नोंदविला. रोमन झॉबनिनकडून मिळालेल्या पासवर राखीव खेळाडू आर्टेम डेज्यूबाने हा गोल नोंदविला. तर सामन्याच्या अंतिम क्षणात इंज्युरी वेळेत डेनिस चेरीशेव्हने (९०+१) गोल नोंदवित रशियाची आघाडी ४-० अशी भक्कम केली. तर आलेक्झेंडर गोलोविनने (९०+४) संघाला ५-० असा एकतर्फी विजय मिळवून दिला.
यंदाच्या वर्ल्डकपसाठी खास बनविण्यात आलेले आलेले ’लिव्ह इट अप’ हे गाणे सगळ्यात सुरुवातीला वाजवून स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ झाला. सुमारे अर्धातासभर रंगलेल्या या रंगारंगी सांगीतिक व नृत्याच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ब्रिटनचा पॉपस्टार रॉबी विल्यम्सने स्थानिक रशियन गायिका एडा गरिफुलिनाच्या साथीत सादरीकरण केले. स्पेनचा आयकॉनिक गोलरक्षक आयकेर कॅसिलास आणि मॉडेल व्हिक्टोरिया लोपरेया झळाळता विश्वचषक घेऊन मैदानावर आले. त्यानंतर ब्राझीलयन लीजंड महान फुटबॉलपटू रोनाल्डोने फुटबॉलला किक मारून विश्वचषकाच्या या महाकुंभाचा शुभारंभ केला. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी वर्ल्डकपचे उद्घाटन झाल्याची अधिकृत घोषणा केली.