
>> सिमोना हालेप- स्लोन स्टीफन्स यांच्यात अंतिम लढत
स्पेनच्या अव्वल मानांकित राफेल नदाल याने २०१५ सालानंतर प्रथमच फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत काल गुरुवारी सेट गमावला. परंतु, यानंतरही त्याने उपांत्यपूर्व फेरीत जोरदार मुसंडी मारताना पावसाने बाधित सामन्यात अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्टझमन याचा ४-६, ६-३, ६-२, ६-२ असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. स्पर्धेच्या अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्याची त्याची ही ११वी वेळ आहे. दुसर्या उपांत्य सामन्यात पाचव्या मानांकित अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याने क्रोएशियाच्या तिसर्या मानांकित मरिन चिलिच याला चार सेटमध्ये ७-६ (७-५), ५-७, ६-३, ७-५ असे पराभूत करत नदालशी गाठ पक्की केली.
मार्को चेकिनाटो व डॉमनिक थिएम यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे.
महिला एकेरीत अव्वल मानांकित सिमोना हालेपने एकतर्फी लढतीत तिसर्या मानांकित गार्बिन मुगुरुझा हिला केवळ १ तास ३२ मिनिटांत ६-१, ६-४ असे हरवून अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी तिला अमेरिकेच्या दहाव्या मानांकित स्लोन स्टीफन्स हिचा सामना करावा लागेल. स्टीफन्सने दुसर्या उपांत्य लढतीत १३व्या मानांकत मॅडिसन कीज हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला. दुसरीकडे चांग युंग जान (तैवान) व इव्हान डॉडिग (क्रोएशिया) या द्वितीय मानांकित जोडीने मिश्र दुहेरीचे विजेेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी मॅट पाविच व गेब्रिएला दाब्रोवस्की या अव्वल मानांकित जोडीला ६-१, ६-७, १०-८ असे हरविले.