>> मताली राजच्या नाबाद ९७ धावा
आशिया चषक टी-२० स्पर्धेत काल रविवारी भारताच्या महिला संघाने मलेशियाचा १४२ धावांनी पराभव केला. मिताली राजच्या ९७ धावांच्या बळावर १६९ धावा फलकावर लगावल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी मलेशियाचा डाव २७ धावांत संपवला.
नाणेफेक जिंकून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली स्मृती मंधाना (२) लवकर परतल्यामुळे मितालीवर जबाबदारी पडली. तिने आपल्या नेहमीच्या बचावात्मक खेळाला बगल देताना आक्रमकतेची कास धरली. केवळ ६९ चेंडूंचा सामना करताना मितालीने १३ चौकार व १ षटकारासह नाबाद ९७ धावा ठोकल्या. कर्णधार हरमनप्रीतने २३ चेंडूंत ३२ व दीप्तीने १२ चेंडूंत नाबाद १८ धावा करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना नवख्या मलेशिया संघाला भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करता आला नाही. त्यांच्या सहा फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. सातव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या साशा आझमी हिने त्यांच्याकडून सर्वाधिक ९ धावा केल्या. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दिलेल्या सहा अवांतर धावा त्यांच्याकडून दुसर्या क्रमांकाच्या सर्वाधिक ठरल्या. भारताकडून पूजा वस्राकरने ३, अनुजा पाटील व पूनम यादवने प्रत्येकी २ तर शिखा पांडेने १ गडी बाद केला.
काल झालेल्या स्पर्धेतील अन्य सामन्यांत श्रीलंकेने बांगलादेशचा ६ गड्यांनी व पाकिस्तानने थायलंडचा ८ गडी राखून पराभव केला. पाच जून रोजी भारत आपला पुढील सामना थायलंडविरुद्ध खेळणार आहे.
धावफलक
भारत ः मिताली राज नाबाद ९७, स्मृती मंधाना त्रि. गो. हाशिम २, पूजा वस्राकर झे. माहिरा गो. झकारिया १६, हरमनप्रीत कौर धावबाद ३२, दीप्ती शर्मा नाबाद १८, अवांतर ४, एकूण २० षटकांत ३ बाद १६९.
गोलंदाजी ः विनीफ्रेड दुराईसिंघम ४-०-२६-०, ऐना हाशिम ४-०-३०-१, नूर झकारिया ४-०-३०-१, साशा आझमी ४-०-३३-०, नादिरा नसरुद्दिन १-०-१४-०, झुमिका आझमी १-०-१५-०, माहिरा ईस्माइल २-०-२०-०.
मलेशिया ः युसरिना याकुप झे. व गो. पांडे ०, क्रिस्तिना बॅरेट त्रि. गो. वस्राकर ०, विनीफ्रेड दुराईसिंघम पायचीत गो. पूनम ५, मास इलिसा झे. मेश्राम गो. वस्राकर २, माहिरा ईस्माइल पायचीत गो. पाटील ०, जमिहिदिया इंतान झे. व गो. पाटील ०, साशा आझमी धावबाद ९, झुमिका आझमी नाबाद ४, नूर झकारिया यष्टिचीत भाटिया गो. पूनम ०, ऐना हाशिम पायचीत गो. वस्राकर ०, नादिरा नसरुद्दिन धावबाद १, अवांतर ६, एकूण १३.४ षटकांत सर्वबाद २७.
गोलंदाजी ः शिखा पांडे २-१-२-१, पूजा वस्राकर ३-०-६-३, अनुजा पाटील २.४-०-९-२, राजेश्वरी गायकवाड २-१-२-०, पूनम यादव २-२-०-२, दीप्ती शर्मा २-१-४-०.