राज्यातील खाण बंदीचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार आणि केंद्रीय नेते गंभीर नाहीत, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केला. सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारी २०१८ रोजी खाणबंदीचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर कोणताही तोडगा काढण्यात भाजपच्या केंद्र आणि राज्यातील सरकारला यश प्राप्त झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुध्दा खाण प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. भाजपला खाण प्रश्नावर तोडगा काढता येत नसल्यास सत्ता सोडावी. कॉंग्रेस पक्ष खाण प्रश्नावर तोडगा काढण्यास सक्षम आहे, असा दावा प्रवक्ते नाईक यांनी केला.
भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून खाण बंदीचा प्रश्न केंद्रीय नेत्यांसमोर मांडला जात आहे. मागील चार महिन्यांत पंतप्रधान कार्यालयानेसुद्धा खाण बंदीची दखल घेतली नाही. खाणबंदीमुळे आर्थिक संकट निर्माण झालेले आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
दिल्ली येथे केंद्र सरकारच्या मंत्र्यांकडे खाण प्रश्न मांडण्यासाठी काही महिन्यांपूर्वी राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेले होते. या शिष्टमंडळाच्या खाणबंदी प्रश्नी केलेल्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजप नेत्यांना पुन्हा एकदा खाण प्रश्न सोडविण्यासाठी दिल्ली येथे धाव घ्यावी लागली आहे. भाजपच्या खासदारांना खाण प्रश्न लोकसभेत मांडण्यात यश आलेले नाही, असेही नाईक यांनी सांगितले.
खाण बंदीच्या प्रश्नावर भाजप आघाडी सरकार फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर आघाडी सरकारमधील काही जणांकडून खाण प्रश्न सोडविण्यासाठी अध्यादेश जारी करण्याची मागणी केली जात आहे. खाण प्रश्नी तोडग्याबाबत भाजपने तीन महिने जनतेला झुलवत ठेवले आहे, अशी टीका ऍड. नाईक यांनी केली.