…तर लोकसभेसाठी भाजपला पाठिंब्याचा फेरविचार ः सरदेसाइ

0
135

>> गोवा फॉरवर्डशिवाय सरकार स्थापनेचे कॉंग्रेसला आव्हान

राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर त्वरित तोडगा न काढल्यास भाजपला आगामी लोकसभा निवडणूक महागात पडेल. या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याबाबत आम्हाला फेरविचार करावा लागेल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.

राज्याची अर्थव्यवस्था खाण व्यवसायावर अवलंबून आहे. खाण व्यवसाय बंद पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील खाण बंदी दूर करण्यासाठी खास अध्यादेश जारी करण्याची गरज आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्याशी खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा केली आहे. खाण बंदीच्या प्रश्‍नावर त्वरित तोडगा न काढण्यास भाजपला लोकसभा निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता असल्याचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, असा दावा मंत्री सरदेसाई यांनी केला.

कॉंग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्डच्याशिवाय सरकार स्थापन करून दाखवावे, असे आव्हान मंत्री सरदेसाई यांनी दिले. गोवा फॉरवर्डमुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थिर आहे. आपणाशी कॉंग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी संपर्क साधलेला नाही. कॉंग्रेस पक्षाची मगोपशी सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. तथापि, कर्नाटकच्या धर्तीवर गोव्यात सरकार स्थापन करण्याचा कॉंग्रेस पक्षाचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. कॉँग्रेस पक्षाचे दोन – तीन आमदार केवळ नाममात्र कॉँग्रेस पक्षात आहेत, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

खाणप्रश्‍नी भूमिकेवर सरकार कमी पडते
सर्वोच्च न्यायालयाने खाण बंदी लागू करून अन्याय केला आहे. सरकारने खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. सरकारने खाण व्यवसायाबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. खाण प्रश्‍नी स्पष्ट भूमिका घेण्यास सरकार कमी पडत आहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले. उर्वरीत देश आणि गोव्यातील खाण व्यवसाय यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे खाण प्रश्‍न सोडविण्यासाठी कायद्यात तरतूद करून अध्यादेश जारी करण्याची गरज आहे. खाणीचा लिलाव केल्यानंतर स्थानिक नागरिकांना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्‍न मंत्री सरदेसाई यांनी उपस्थित केला.
संतोष सावंत यांचा गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश
मये मतदारसंघातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतोष कुमार सावंत यांनी गोवा फॉरवर्डमध्ये काल प्रवेश केला.

युती धर्माबाबत कोणी
सल्ला देऊ नये
गोवा फॉरवर्डला युतीचा धर्म पाळण्याचा सल्ला कुणीही देऊ नये. समाजात सकारात्मक कार्य करणार्‍याला आश्रय देण्याचे काम पक्ष करीत आहे. भाजपच्या नेत्यांनी सुध्दा याचा विचार करण्याची गरज आहे. भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत आमची मदत हवी असल्यास गोवा फॉरवर्डचे मये मतदारसंघातील कार्यकर्ते संतोष सावंत यांना योग्य वागणूक द्यावी, असेही मंत्री सरदेसाई यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.