>> प्रत्येकी दहा कोटींची विकासकामे
सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सत्ताधारी गटाचे आमदार आणि अभियंत्यांची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला आहे. प्रत्येक मतदारसंघात १० कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री ढवळीकर यांनी दिली.
या बैठकीत सत्ताधारी गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांवर चर्चा करण्यात आली. मंत्री ढवळीकर यांनी बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना विकासकामांना गती देण्याचा आदेश दिला आहे.
प्रत्येक मतदारसंघात १० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मतदारसंघातील अपूर्ण कामे सप्टेंबरनंतर सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली.
प्रत्येक मतदारसंघातील जुन्या पाण्याच्या जलवाहिन्या बदलण्यासाठी खास तरतूद केली जाणार आहे. जुन्या जलवाहिन्यांमुळे सुरळीत पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होतात, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
मंत्री ढवळीकर यांनी यापूर्वी विरोधी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला होता. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांचे अहवाल २५ मे २०१८पर्यत सादर करण्याची सूचना अभियंत्यांना करण्यात आलेली आहे. विकास कामांबाबत सरकारी पातळीवरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष विकासकामे हाती घेतली जाऊ शकतात, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.