>> सर्वाधिक दीड लाख रशियातून : ९६९ चार्टर फ्लाईटची नोंद
यंदाचा पर्यटन हंगाम समाप्तीच्या टप्प्यावर पोहोचला असून या हंगामात सुमारे अडीच लाख विदेशी पर्यटकांनी राज्याला भेट दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत विदेशी पर्यटकांची संख्येत वाढ झाली आहे. राज्याला भेट देणार्या विदेशी पर्यटकांमध्ये रशियन पर्यटकांची संख्या सर्वाधिक दीड लाखापेक्षा जास्त आहे. तर, जर्मनी, लुथानियामधून एकाही पर्यटकाची नोंद झालेली नाही.
गतवर्षी वर्ष २०१६ -१७ मध्ये ९८८ चार्टर फ्लाईटमधून २ लाख ३२ हजार ६७९ विदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. पर्यटन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २२ एप्रिल २०१८ पर्यंत ९६९ चार्टर फ्लाईटमधून २ लाख ४५ हजार ७८१ पर्यटकांनी भेट दिली आहे. यंदा चार्टर फ्लाईटची संख्या एक हजाराच्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रशियातून ६३९ चार्टर फ्लाईटमधून १ लाख ६६ हजार ०५७ पर्यटकांनी भेट दिली आहे. डिसेंबर महिन्यात रशियातून सर्वाधिक १२८ चार्टर विमाने दाखल झाली.
यु.के. मधून २११ चार्टर फ्लाईट दाखल झाली आहेत. त्यातून ५५ हजार ५८६ पर्यटकांनी भेट दिली. फिनलँण्डमधून १५ चार्टर फ्लाईटमधून २३९८ पर्यटकांनी भेट दिली.
इरानमधून सात चार्टर फ्लाईटमधून ६३१ पर्यटकांनी भेट दिली. कझाकिस्तानमधून ५१ चार्टर फ्लाईटमधून ११३३८ आणि युक्रेनमधून ४६ चार्टर फ्लाईटमधून ९७७१ विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे.
मागील दोन वर्षापासून घट झालेल्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये ११२८ चार्टर फ्लाईटमधून २ लाख ६१ हजार ४५४ विदेशी पर्यटक आले होते. वर्ष २०१४- १५ मध्ये विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली.
या वर्षी ८९५ चार्टर फ्लाईटमधून १ लाख ६१ हजार ३१६ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यानंतर २०१५-१६ मध्ये ७९८ चार्टर फ्लाईटमधून १ लाख ५८ हजार ७७९ विदेश पर्यटकांची नोंद झाली. वर्ष २०१६-१७ मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.