
>> राहुल-सोनियांशी चर्चा
>> उपमुख्यमंत्रीपदाबाबत एकमत नाही
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या बुधवारी शपथ घेण्याआधी जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांनी काल येथे कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या व्यतिरिक्त बसपा नेत्या मायावती, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी भेटी घेऊन चर्चा केली. राहुल व सोनिया गांधी यांच्याशी कुमारस्वामी यांनी सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा केली. दरम्यान संभाव्य पेचप्रसंग टाळण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे. मात्र या प्रस्तावाला जेडीएस अनुकूल नसल्याचीही चर्चा आहे. आपण स्थिर सरकार देणार असल्याचे बैठकीनंतर कुमारस्वामी म्हणाले.
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदासाठीचे एक प्रमुख दावेदार आहेत. १२ वर्षांनंतर कुमारस्वामी उद्या दुसर्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्याआधी खाते वाटपावर राहुल गांधी यांच्याशी चर्चेसाठी त्यांनी काल दिल्ली गाठली. राहुल – सोनिया यांच्याबरोबर सुमारे २० मिनिटे कुमारस्वामी यांनी या विषयावर बोलणी केली. उभय पक्षांना मंत्रिमंडळ रचनेत समतोल ठेवण्यावर यावेळी भर देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत मनमोकळी चर्चा झाली. आता आम्हाला एकत्रित काम करायचे असल्याने आपण कॉंग्रेस श्रेष्ठींचा सल्ला घेण्यासाठी आल्याचे कुमारस्वामी यांनी पत्रकारांना सांगितले.
आम्ही पुढील गोष्टींवर निर्णय घेतलेला नाही. असे असले तरी आम्ही स्थिर सरकार देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंगळुरूतील आपल्या शपथविधीसाठी आपण राहुल व सोनिया गांधी यांना निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारल्याचे ते म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कुमारस्वामी २४ तासांत विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत कॉंग्रेस व जेडीएस यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे.