आता दुसरा अंक

0
134

कर्नाटकचे औटघटकेचे मुख्यमंत्री ठरलेल्या येडीयुराप्पांनी विधानसभेत भावपूर्ण भाषण करून दिलेल्या राजीनाम्या मुळे कर्नाटकच्या नाटकाचा पहिला अंक अचानक संपला. येडीयुराप्पांच्या त्या भाषणात नैतिकतेचा आणि त्यागाचा मोठा आव होता, परंतु बहुमताचा आकडा पार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही डाळ न शिजल्यानेच ही पाळी ओढवली हे स्पष्ट आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा लोकसभेमध्ये असेच भावपूर्ण भाषण करून राजीनाम्याची नाट्यमय घोषणा केली होती, परंतु वाजपेयींच्या त्या भाषणाला असलेली नैतिकतेची किनार यावेळी दिसली नाही. मुळात बहुमतासाठी आवश्यक संख्या नसताना आणि कॉंग्रेस व जनता दल सेक्युलरने निवडणुकोत्तर आघाडीद्वारे आवश्यक बहुमतानिशी सरकार स्थापनेचा दावा केलेला असताना राज्यपालांनी येडीयुराप्पांना सरकार स्थापनेसाठी बोलावणे आश्चर्यकारक होते. नैतिकतेची एवढी चाड असती तर बहुमत नसताना सरकारस्थापनेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून येडीयुराप्पा धावले नसते. सरकार घडवायला गेलो की भटके पक्षी आपसूक येतील असा त्यामागील होरा असावा, परंतु कॉंग्रेस – जेडीएसने एवढी भक्कम मोर्चेबांधणी केली होती की ते असंभव बनले. आपल्यापाशी आवश्यक संख्याबळ नसल्याचे पाहून कॉंग्रेस – जेडीएसला त्यांचे सरकार स्थापन करू देण्याचे शहाणपण भाजपला दाखवता आले असते, परंतु सत्तेची हाव स्वस्थ कशी बसू देईल? राज्यपालांनी येडीयुराप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली तब्बल पंधरवड्याची मुदत मिळाली असती तर घोडेबाजार चाललाही असता, परंतु कॉंग्रेसने प्रथमच कमालीची चपळ रणनीती यावेळी आखल्याचे दिसून आले. निवडणुकीचे निकाल येता येता त्यांनी जेडीएसशी संधान साधले. वास्तविक देवेगौडा आणि नरेंद्र मोदींनी एकमेकांवर उधळलेली स्तुतीसुमने पाहता निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती उद्भवल्यास जेडीएस भाजपच्या मदतीला जाईल अशी शक्यता व्यक्त होत होती, परंतु कॉंग्रेसने गतिमान हालचाली करून जेडीएसला मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवले आणि क्षणात पारडे ङ्गिरले. राज्यपालांनी येडीयुराप्पांना सरकार स्थापनेसाठी पाचारण करून पंधरवड्याची मुदत देताच त्याविरुद्ध तात्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन रातोरात ती मुदत २४ तासांवर आणण्यात कॉंग्रेसला यश मिळाले तेव्हाच येडीयुराप्पांच्या सत्तेच्या वाटेत काटे पेरले गेल्याचे स्पष्ट झाले होते. कॉंग्रेस – जेडीएसच्या आमदारांच्या विमानोड्डाणाला ऐनवेळी केंद्र सरकारने परवानगी नाकारणे, राज्यपालांनी ज्येष्ठताक्रम डावलून बोपय्या यांना हंगामी सभापती नेमणे आदी घटनाक्रम पाहता विरोधकांच्या हाती सत्ता जाऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न झाल्याचे जाणवते. जनार्दन रेड्डी व स्वतः येडीयुराप्पांनी आमदारांना ङ्गोडण्याचा प्रयत्न केल्याच्या ध्वनिङ्गिती कॉंग्रेसने जारी केल्या आहेत. त्या किती खर्‍या, किती खोट्या हे स्पष्ट नाही, परंतु एकूण घटनाचक्र पाहिले तरी भाजप उर्वरित संख्याबळ प्राप्त करून आपले सरकार स्थापण्यासाठी पुरेपूर प्रयत्नशील होते हेच दिसते. नितीन गडकरींनी ज्या प्रकारे गोव्यात येऊन रातोरात सत्तेचे पारडे आपल्या बाजूने वाकवले होते, तसे जावडेकरांना जमले नाही. त्या तुलनेत कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद आणि अशोक गेहलोत सुरवातीपासून कर्नाटकात तळ ठोकून होते आणि त्यांनी आणि दिल्लीतील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आदी पक्षनेत्यांनी विलक्षण ताळमेळानिशी वेगवान राजकीय हालचाली केल्या आणि भाजपचे सत्तेचे स्वप्न उधळले. कर्नाटक मधील आपले सरकार कॉंग्रेसने गमावले, त्यामुळे त्यांची जी छीः थू झाली असती, ती या निवडणुकोत्तर चपळ हालचालींमुळे टळली आणि या निमित्ताने गोवा, मिझोराम, मणिपूरमध्ये सर्वांत मोठा पक्ष असूनही आपल्याला कसे भाजपने सत्तेपासून दूर ठेवले ते देशासमोर आणण्याची संधीही त्यांना लाभली. जनतेने आम्हाला सर्वांत मोठा पक्ष म्हणून कौल दिलेला असूनही आम्ही सत्तेपासून दूर राहिलो असे आता भाजप म्हणत असला तरी प्रत्यक्षात कर्नाटकचा कौल हा भाजपाच्या बाजूने निर्विवाद असल्याचे म्हणता येत नाही. जनतेचा कौल संमिश्र स्वरुपाचा आहे आणि प्रांतनिहाय तो वेगवेगळा आहे. कॉंग्रेसला जागा कमी मिळाल्या असल्या तरी भाजपपेक्षा १.८ टक्के अधिक मते मिळाली आहेत. भाजप विजयी झालेल्या ८० टक्के जागांवर आणि जेडीएस विजयी झालेल्या ६८ टक्के जागांवर कॉंग्रेस दुसर्‍या स्थानी आहे. बहुतेक प्रांतांमधील भाजप आणि कॉंग्रेसच्या मतांमध्ये ङ्गारसा ङ्गरक नाही. किनारी कर्नाटकमध्ये भाजपला मोठी मतांची आघाडी मिळाली तशी ती अन्यत्र दिसत नाही. त्यामुळे जनतेने आम्हाला कौल दिला, परंतु कॉंग्रेस – जेडीएसने सत्तेपासून दूर ठेवले हा युक्तिवाद भ्रामक आहे. अर्थात, कर्नाटकच्या नाटकातील हा केवळ पहिला अंक आहे. आता कॉंग्रेस – जेडीएस राज्यात सत्तारूढ होणार असली, तरी त्यांच्यापाशी ङ्गारच निसटते बहुमत आहे हे विसरून चालणार नाही. यापुढे घोडेबाजार चालणारच नाही असे नाही. त्यामुळे ज्या अग्निपरीक्षेतून येडीयुराप्पांना जावे लागले, त्यातून कुमारस्वामींनाही जावेच लागेल.