
लुंगी एन्गिडीच्या भेदक गोलंदाजीनंतर सुरेश रैनाच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ५ गडी राखून मात करीत आयपीएलच्या ११व्या पर्वात गट फेरीतील आपले दुसरे स्थान राखले. त्यामुळे २३ मे रोजी होणार्या क्लॉलिफायर-१ लढतीत त्यांची गाठ आता अग्रस्थानावरील सनरायझर्स हैदराबाद संघाशी पडणार आहे. तर पराभवामुळे पंजाबचे आव्हान संपुष्टात आले असून त्याचा फायदा राजस्थान रॉयल्सला झाला आहे. त्यांनी एलिमिनेटर-१ लढतीसाठी पात्रता मिळविली असून त्यांची गाठ कोलकाता नाइटरायडर्सशी पडणार आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबला १५३ धावांवर रोखल्यानंतर चेन्नईने विजयी लक्ष्य १९.१ षट्कांत गाठले. सुरेश रैनाने विजयात मोलाचा वाटा उचलताना ४ चौकार व २ षट्कारांनिशी ४८ चेंडूत नाबाद ६१ धावांची खेळी केली. दीपक चहरने ३९, हरभजन सिंगने १९ तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद १६ धावा जोडल्या. पंजाबतर्फे अंकित राजपूत व रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी २ गडी गारद केले.
तत्पूर्वी लुंगी एन्गिडीच्या भेदक मार्याच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा डाव १९.४ षट्कांत १५३ धावांवर संपुष्टात आणला होता. बहरातील फलंदाज लोकेश राहुल (७) व धोकादायक ख्रिस गेल याला खाते खाते खोलण्यापूर्वीच तंबूचा रस्ता दाखवित लुंगी एन्गिडीने चेन्नईला प्रारंभीच यश मिळवून दिले. लगेच दीपक चहरने आरोन फिन्चला (४) सुरेश रैनाकरवी झेलबाद करीत पंजाबला आणखी एक झटका दिला. त्यानंतर मनोज तिवारी (३५) आणि डॅव्हिड मिलर (२४) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर बर्याच दिवसानंतर लय मिळालेल्या करुण नायरने आपला तडाखा दाखवताना ३ चौकार व ५ षट्कारांनिशी २६ चेेंडूत ५४ धावांची जबरदस्त खेळी करीत चेन्नईसमोर १५४ धावांचे आव्हनात्मक लक्ष्य उभे केले होते. चेन्नईतर्फे एन्गिडीने ३ तर शार्दुल व ब्राव्हो यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब ः लोकश राहुल त्रिफळाचित लुंगी एन्गिडी ७, ख्रिस गेल झे. महेंद्रसिंह धोनी गो. लुंगी एन्गिडी ०, आरोन फिन्च झे. सुरेश रैना गो. दीपक चहर ४, मनोज तिवारी झे. महेंद्रसिंह धोनी गो. रविंद्र जडेजा ३५, डॅव्हिड मिलर त्रिफळाचित गो. ड्वायन ब्राव्हो २४, करुण नायर झे. दीपक चहर गो. ड्वायन ब्राव्हो ५४, अक्षर पटेल झे. सॅम बिलिंग्स गो. शार्दुल ठाकुर १४, रविचंद्रन अश्विन झे. महेंद्रसिंह धोनी गो. लुंगी एन्गिडी ०, अँड्र्यू टाय झे. सुरेेश रैना गो. लुंगी एन्गिडी ०, मोहित शर्मा नाबाद २, अंकित राजपूर झे. फाफ डु प्लेसिस गो. शार्दुल ठाकुर २.
अवांतर ः ११. एकूण १९.४ षट्कांत सर्वबाद १५३ धावा.
गोलंदाजी ः दीपक चहर ४/०/३०/१, लुंगी एन्गिडी ४/१/१०/४, हरभजन सिंग १/०/१३/०, शार्दुल ठाकुर ३.४/०/३३/२, ड्वायन ब्राव्हो ४/०/३९/२, रविंद्र जडेजा ३/०/२३/१.
चेन्नई सुपर किंग्ज ः अंबाती रायडू झे. लोकेश राहुल गो. मोहित शर्मा १, फाफा डु प्लेसिस झे. ख्रिस गेल गो. अंकित राजपूत १४, सुरेश रैना नाबाद ६१, सॅम बिलिंग्स त्रिफळाचित गो. अंकित राजपूत ०, हरभजन सिंग पायचित गो. रविचंद्रन अश्विन १९, दीपक चहर झे. मोहित शर्मा गो. रविचंद्रन अश्विन ३९, महेंद्रसिंह धोनी नाबाद १६.
अवांतर ः ९. एकूण १९.१ षट्कांत ५ बाद १५९ धावा.
गोलंदाजी ः अंकित राजपूत ४/१/१९/२, मोहित शर्मा ३.१/०/२८/१, अँड्र्यू टाय ४/०/४७/०, अक्षर पटेल ४/०/२८/०, रविचंद्रन अश्विन ४/०/३६/२.