
>> कायरन पोलार्डचे अर्धशतक
>> जसप्रीत बुमराहचा प्रभावी मारा
मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना काल बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबवर ३ धावांनी विजय मिळविला. राहुलचा कडवा प्रतिकार मोडून काढत मुंबईने इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील या ५०व्या सामन्यात विजय नोंदवून गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली.
विजयासाठी १८७ धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाला १८३ धावांपर्यंतच पोहोचता आले. राहुलने ६० चेंडूंचा सामना करताना १० चौकार व ३ षटकारांसह ९४ धावांची खेळी केली. संघाच्या पराभवानंतर मात्र त्याला अश्रु आवरेनासे झाले.
तत्पूर्वी, मधल्या फळीत कायरन पोलार्डने केलेली फटकेबाजी आणि त्याला कृणाल पंड्याने दिलेली साथ या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर खेळताना पंजाबसमोर १८७ धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पंजाबच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या क्षणांमध्ये चांगला मारा करत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला.
‘नकल बॉल’ स्पेशलिस्ट अँडी टाय मुंबईसाठी कर्दनकाळ ठरला. त्याने सर्वप्रथम विंडीजचा डावखुरा स्फोटक सलामीवीर इविन लुईसचा त्रिफळा उडविला व यानंतर युवा इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. काही चेंडू चाचपडल्यानंतर रोहित शर्माने आपल्या ‘फ्लॉप शो’ची मालिका कायम राहणार याची दक्षता घेत बेजबाबदार फटका खेळून अंकित राजपूतला आपली विकेट बहाल केली. यावेळी मुंबईचा संघ ४ बाद ७१ अशा केविलवाण्या स्थितीत होता. मात्र ड्युमिनीच्या जागी संघात जागा मिळालेल्या पोलार्डने कृणाल पांड्याच्या साथीने भागीदारी करत संघाचा डाव सावरवला. पोलार्डने अर्धशतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. पंजाबकडून टायने ४ फलंदाजांना माघारी धाडत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. त्याला रविचंद्रन अश्विनने २ तर मार्क स्टोईनिस आणि अंकित राजपूतने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.
धावफलक
मुंबई इंडियन्स ः सूर्यकुमार यादव झे. राहुल गो. टाय २७, इविन लुईस त्रि. गो. टाय ९, इशान किशन झे. स्टोईनिस गो. टाय २०, रोहित शर्मा झे. युवराज गो. राजपूत ६, कृणाल पंड्या झे. राजपूत गो. स्टोईनिस ३२, कायरन पोलार्ड झे. फिंच गो. अश्विन ५०, हार्दिक पंड्या झे. अश्विन गो. टाय ९, बेन कटिंग झे. पटेल गो. अश्विन ४, मिचेल मॅकलेनाघन नाबाद ११, मयंक मार्कंडे नाबाद ७, अवांतर ११, एकूण २० षटकांत ८ बाद १८६.
गोलंदाजी ः अंकित राजपूत ४-०-४६-१, मोहित शर्मा ३-०-३४-०, अँडी टाय ४-०-१६-४, अक्षर पटेल ३-०-२४-०, रविचंद्रन अश्विन ३-०-१८-२, मार्कुस स्टोईनिस ३-०-४३-१.
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल झे. कटिंग गो. बुमराह ९४, ख्रिस गेल झे. कटिंग गो. मॅकलेनाघन १८, ऍरोन फिंच झे. हार्दिक गो. बुमराह ४६, मार्कुस स्टोईनिस झे. किशन गो. बुमराह १, अक्षर पटेल नाबाद १०, युवराज सिंग झे. लुईस गो. मॅकलेनाघन १, मनोज तिवारी नाबाद ४, अवांतर ९, एकूण २० षटकांत ५ बाद १८३.
गोलंदाजी ः मिचेल मॅकलेनाघन ४-०-३७-२, जसप्रीत बुमराह ४-०-१५-३, हार्दिक पंड्या ४-०-४२-०, कृणाल पंड्या ४-०-३६-०, मयंक मार्कंडे ३-०-३४-०, बेन कटिंग १-०-१५-०.