
>> चेन्नई ‘प्ले ऑफ’मध्ये, मुंबईच्या शक्यता वाढल्या
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने काल सोमवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील ४८व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा १० गडी व ७१ चेंडू राखून पराभव केला. पंजाबचा डाव ८८ धावांत गुंडाळल्यानंतर कोहली-पार्थिव जोडीने तुफानी फटकेबाजी करत ८.१ षटकांत संघाला विजयी केले. गडी व चेंडूच्या दृष्टीने यंदाच्या स्पर्धेतील हा सर्वांत मोठा विजय ठरला.
पंजाबच्या पराभवाचा फायदा चेन्नईला झाला असून यामुळे त्यांनी ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केला आहे. पंजाबचा संघ विजयी झाला असता तर मुंबई इंडियन्सची वाटचालदेखील बिकट झाली असती. विशाल विजयामुळे बंगलोरने आपले या स्पर्धेतील आव्हान राखताना इतरांना इशारा दिला आहे.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने नाणेफेक जिंकत धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. किंग्स इलेव्हनच्या डावाची सुरुवात भयावह होणार होती. परंतु, एकहाती झेल घेण्याच्या नादात उमेशने टाकलेल्या डावातील पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर पार्थिव पटेलने गेलचा झेल सोडला. यावेळी गेलने खातेदेखील उघडले नव्हते. साऊथीने टाकलेल्या दुसर्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राहुलने पहिला आक्रमक फटका खेळताना षटकार ठोकला. चेंडू स्विंग होत असल्याने गेल-राहुल जोडीने अधिक धोका पत्करण्याचे टाळले. चेंडू स्विंग होत असल्याचे पाहून कोहलीने यादवला सलग तिसरे षटक देण्याचा जुगार खेळला. याच जुगाराने बंगलोरला दोन विकेट मिळवून दिल्या. सर्वप्रथम राहुल हूक करण्याच्या नादात सीमारेषेवर बाद झाला तर गेलने ऑफस्टंपबाहेरील चेंडू लेगसाईडला फटकावण्याच्या नादात आपली विकेट गमावली. या दोघांच्या पततानंतर पंजाबच्या डावाला उतरती कळा लागली. सिराजच्या झपकन आत आलेला चेंडू ‘थर्ड मॅन’च्या दिशेने ढकलण्याच्या नादात करुण नायर स्लिपमध्ये विराटकडे झेल देऊन माघारी परतला. यावेळी फलकावर केवळ ४१ धावा लागल्या होत्या. ६ षटकांत पंजाबने ३ बाद ४७ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर कोहलीने आपले हुकमी इक्का असलेल्या चहलला आणले. फ्रंटवर खेळणारा चेंडू बॅकफूटवर खेळण्याच्या नादात त्याचा त्रिफळा उडाला. मयंक अगरवाल व फिंच यांच्याकडून डावाला आकार देण्याची अपेक्षा असताना अगरवाल मध्यमगती गोलदांज ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर लेगसाईडला झेलबाद झाला. त्याने केवळ दोन धावा केल्या. फिंचने एकहाती किल्ला लढवताना २६ धावा केल्या. डावातील १२ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोईन अलीला मैदानाबाहेर भिरकावण्याच्या नादात फिंच व त्याच्या पुढच्याच चेंडूवर कर्णधार अश्विन स्वतःच्या चुकीमुळे धावबाद झाला. यावेळी पंजाबचा संघ ७ बाद ७८ असा चाचपडत होता. उमेश यादवने टायचा काटा काढल्यानंतर मोहित व अंकित हे शेवटचे दोन्ही गडी धावबाद झाले. आज राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे.
धावफलक
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल झे. ग्रँडहोम गो. यादव २१, ख्रिस गेल झे. सिराज गो. यादव १८, करुण नायर झे. कोहली गो. सिराज १, ऍरोन फिंच झे. कोहली गो. अली २६, मार्कुस स्टोईनिस त्रि. गो. चहल २, मयंक अगरवाल झे. पटेल गो. ग्रँडहोम २, अक्षर पटेल नाबाद ९, रविचंद्रन अश्विन धावबाद ०, अँडी टाय झे. पटेल गो. यादव ०, मोहित शर्मा धावबाद ३, अंकित राजपूत धावबाद २, अवांतर ५, एकूण १५.१ षटकांत सर्वबाद ८८.
गोलंदाजी ः उमेश यादव ४-०-२३-३, टिम साऊथी २-०-१९-०, मोहम्मद सिराज ३-०-१७-१, युजवेंद्र चहल २-०-६-१, कॉलिन डी ग्रँडहोम २-०-८-१, मोईन अली २.१-०-१३-१.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः विराट कोहली नाबाद ४८, पार्थिव पटेल नाबाद ४०, अवांतर ४, एकूण ८.१ षटकांत बिनबाद ९२.
गोलंदाजी ः रविचंद्रन अश्विन १-०-९-०, अँडी टाय ४-०-३३-०, अंकित राजपूत १.१-०-२१-०, मोहित शर्मा १-०-१५-०, मार्कुस स्टोईनिस १-०-१२-०.